Israel Palestine War: इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध काँग्रेसने (Congress) केला असून त्यासंबंधित एक ठराव आपल्या कार्यकारिणीत मंजूर करून घेतला. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला, याचा आम्ही निषेध करत असून त्या प्रदेशात शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असं आवाहनही काँग्रेसने केलं आहे.
काँग्रेसने ठरावात नक्की काय म्हटलं?
काँग्रेसने आपल्या ठरावात म्हटलं, "काँग्रेस इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेल्या युद्धाबद्दल आणि हजारांहून अधिक लोकांच्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख आणि वेदना व्यक्त करते. लोकांच्या जमीन, स्वशासन आणि स्वाभिमान आणि सन्मानाने जगण्याच्या हक्कांसाठी दीर्घकालीन समर्थनाचा पुनरुच्चार काँग्रेस करते."
या प्रदेशात युद्धविराम घोषित करण्यात यावं आणि दीर्घ कालापासून प्रलंबित असलेल्या या मुद्द्यांवर चर्चा करण्यात यावी आणि चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असं आवाहनही काँग्रेसने आपल्या ठरावात केलं आहे.
काँग्रेसचं पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन
काँग्रेसचा हा एक समतोल राखणारा ठराव म्हणता येईल. कारण यात असंही म्हटलं गेलं आहे की, इस्रायली नागरिकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यांचा देखील आम्ही निषेध करतो. पण पॅलेस्टाईनसंदर्भातील आपली भूमिका कायम असल्याचं काँग्रेसने या ठरावात म्हटलं आहे.
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादात काँग्रेसने सुरुवातीपासून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यात यावा, युद्ध यावर पर्याय नाही अशी भूमिका काँग्रेसची आहे. आताही काँग्रेसने हमास या दहशतवादी संघटनेच्या कृत्याचा निषेध केला.
बिघडत आहे इस्रायलची परिस्थिती
पॅलेस्टिनी सशस्त्र सैनिकांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर (Israel) हल्ला केल्यानंतर इस्रायलमधील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. महिला असोत, लहान मुलं असोत किंवा वयोवृद्ध असोत, हमासचे सैनिक आपल्या कटाचा एक भाग म्हणून सर्वांनाच लक्ष्य करू लागले आहेत.
इस्रायल देखील आता पॅलेस्टिनी समर्थक असलेल्या हमासच्या या रक्तरंजित हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. हे युद्ध 7 ऑक्टोबरला सुरू झालं, जेव्हा हमासच्या सैनिकांनी एक-एक करून जमीन, हवाई आणि समुद्रातून 5,000 रॉकेट इस्रायलवर डागण्यास सुरुवात केली.
इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात 1,000 हून अधिक जणांचा मृत्यू
इस्रायल या हल्ल्यासाठी तयार नसताना हमासने अचानक हल्ला चढवला. इस्त्रायली सैनिक या परिस्थितीसाठी तयार नसतानाही ते पॅलेस्टिनी आणि हमासच्या हल्ल्याला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत, त्यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. रॉकेट हल्ल्याने सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे 1,000 हून अधिक लोक मारले गेले. तर सुमारे 2,000 हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इस्रायलच्या प्रत्युत्तरात देखील बऱ्याच पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे.
हेही वाचा: