मुंबईइस्रायल (Israel) आणि हमासचे (Hamas) युद्ध (War) दिवसागणिक रौद्र रुप धारण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या युद्धामध्ये भारतीय वंशाच्या (Indian) तीन महिलांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील एक महिला ही मूळची महाराष्ट्राची (Maharashtra) असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या किम डोकरकर या महिलेचा या युद्धादरम्यान मृत्यू झाला. किम डोकरकर या इस्रायली सैन्यात त्यांचं कर्तव्य बजावत होत्या. त्याच दरम्यान त्यांना वीरमरण आलं. तर यातील दुसरी महिला ही इस्रायलच्या पोलीस दलात कार्यरत होती. यामधील एका महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही.  


इस्रायलच्या आणि हमासच्या युद्धामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. तर अनेक जण पोरके होत आहेत. या युद्धाची विद्रोहकता इतकी तीव्र होत चालली आहे, की यामध्ये अनेकांनी प्राण गमावले तर घर, कुटुंबही गमावलं आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मयादेशी परत आणण्यासाठी भारताकडून ऑपरेशन अजय देखील सुरु करण्यात आले आहे. 


धगधगत्या युद्धभूमीत 'एबीपी माझा'


दरम्यान या युद्धाचे प्रत्येक अपडेट आता एबीपी माझाच्या माध्यमातून मिळणार आहेत. एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी  धगधगत्या युद्धभूमीतून इस्रायलमधील परिस्थितीवर भाष्य करत आहेत.  दरम्यान यावेळी त्यांनी इस्रायलच्या नागरिकांशी देखील संवाद साधला. त्यावेळी हे युद्ध लवकर थांबावे अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया इस्रायलच्या नागरिकांनी एबीपी माझाला दिली. 


इस्रायल-पॅलेस्टिनी युद्ध सुरुच


गाझा येथे इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आतापर्यंत 2215 पॅलेस्टिनींना आपला जीव गमावला आहे, जखमींची संख्या 8,714 आहे. मृतांमध्ये 700 मुलांचाही समावेश आहे. वेस्ट बँकमध्ये आतापर्यंत 50 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 वर पोहोचली आहे, तर 3400 लोक जखमी आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहेत.


इस्रायल-हमास युद्धात 12 पत्रकारांचा मृत्यू


इस्रायल-हमास युद्धात पत्रकारांचाही मृत्यू झाला असून काही पत्रकार जखमी झाले आहेत. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या हिंसाचारात सुमारे 12 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे, तर आठ जण जखमी झाले आहेत. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्सने शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली आहे.



हेही वाचा : 


Israel Hamas War : मृत्यूचं तांडव! इस्रायल-हमास युद्धात 4500 हून अधिक मृत्यू, जखमींचा आकडा 12000 पार; 197 भारतीयांची तिसरी तुकडी मायदेशी परतली