Israel Hamas War: इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेन्जमीन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी ट्वीट केलेल्या काही फोटोंमुळे जग हादरून गेलं आहे. हमासनं (Hamas) इस्रायलच्या हद्दीत घुसून अनेकांची हत्या केली होती. त्यात अनेक तान्ह्या बाळांचं शिरकाण देखील करण्यात आलं होतं. त्यातल्या काही बाळांना तिथंच अक्षरशः जाळून टाकण्यात आलं होतं. हे फोटो पाहिलं की, ह्रदयाला पीळ पडतो. काही दिवसांचे हे जीव.... जग पाहणं तर सोडाच, या तान्हुल्यांना आपल्या आजुबाजूला काय सुरू आहे, हे देखील कळत नसतं. अशा परिस्थितीत त्यांची निर्घृण हत्या करणं, त्यानंतर त्यांचे मृतदेह तिथेच जाळून टाकणं, अशी कृत्य करणाऱ्यांना माणूस म्हणायलाही मन धजावत नाही. कारण काहीही असो, राग कितीही रास्त असो किंवा नसो... पण अशी हीन कृत्य जगात कुठेच आणि कधीच घडू नये इतकंच म्हणावंसं वाटतंय... नेतन्याहू यांच्या ट्वीटनं अवघं जग हळहळतंय. 


इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आठ दिवस झाले आहेत. गुरुवारी (12 ऑक्टोबर) इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयानं एक फोटो जारी केला, ज्यामध्ये हत्या करण्यात आलेल्या नवजात बाळांच्या आणि लहान मुलांच्या मृत्यूमागे हमासचा हात असल्याचा दावा करण्यात आला होता. नेत्यानाहू यांनी काही फोटो ट्वीट केले आहेत. फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी दावा केलाय की, हमासच्या सैनिकांनीच त्या नवजात बाळांचा जीव घेतला आहे.


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना इस्रायलनं दाखवले फोटो


अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या तेल अवीव भेटीदरम्यान इस्रायलनं त्यांना हे फोटो दाखवल्याचं म्हटलं होतं. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन हे फोटो जारी करत लिहिलंय की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांना दाखवलेली ही काही छायाचित्रं. 


अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?


ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियननं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकनच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, या वातावरणाचं वर्णन करण्यासाठी योग्य शब्द निवडणं माझ्यासाठी कठीण झालं आहे. एका नवजात बाळाला गोळ्या लागल्या आहेत. सैनिकांचा शिरच्छेद केला जात आहे. गाडीच्या आत लोकांना जिवंत जाळलं जातंय. ते म्हणाले, हमास क्रूर आणि अमानुष असल्याचे नवनवे पुरावे जग रोज पाहत आहे. इस्रायली मीडियानुसार, शनिवारी (7 ऑक्टोबर 2023) हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये मृतांची संख्या 1300 च्या जवळ पोहोचली आहे, तर 3300 लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.


इस्रायलमधील भारतीयांसाठी 'ऑपरेशन अजय'


ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेले 212 भारतीय मायदेशात परतले आहेत. एअर इंडियाचं विमान सकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी भारतात उतरलं. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी सरकार ऑपरेशन अजय मोहीम राबवत आहे. दरम्यान सुमारे 18 हजार भारतीय नागरिक कामासाठी आणि अभ्यासासाठी इस्रायलमध्ये राहत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Israel Gaza Attack: इस्रायल-हमास युद्धाचा आठवा दिवस, जोपर्यंत आमच्या नागरिकांना सोडत नाही, तोपर्यंत पाणी बंद; इस्रायलचा इशारा