IND vs PAK World Cup 2023 : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोघांमध्ये लढत होईल. या सामन्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात आतापर्यंत अजेय आहे. भारताने पाकिस्तानला सातवेळा पराभूत केले आहेत. पाकिस्तानचा आठवा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रोमांचक होणार आहे. अहमदाबाद येथे होणाऱ्या या रोमांचक सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाची कमकुवत बाजू समोर आली आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषकात सलग दोन सामने जिंकले आहेत, पण असे असतानाही पाकिस्तान संघाची कमजोरी समोर आली आहे, जी पाकिस्तानच्या एका दिग्गज क्रिकेटपटूनेच समोर आणली आहे. या कमजोरीचा फायदा टीम इंडिया उचलू शकते.
पाकिस्तान संघाची मोठी कमजोरी काय?
हसन अली पाकिस्तान संघाची सर्वात कमजोर बाजू आहे. हसन अली याने विकेट घेतल्या आहेत, पण त्याने धावा जास्त खर्च केल्या आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांच्या मते, नसीम शाहच्या अनुपस्थितीत नवीन चेंडू हताळण्यासाठी हसन अली हा सर्वोत्तम पर्याय नाही. हरिस रौफला घडवण्यात आकिबने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आकिब म्हणाला की, नवीन चेंडू हाताळण्यासाठी मागील 12 महिन्यांत कोणालाही तयार केले नाही. नसीमच्या अनुपस्थितीत नवीन चेंडूसह तिसरा पर्याय कोण असेल, हे निवडकर्त्यांना माहीत नाही. आशिया चषकादरम्यान त्यांनी कुणालाही आजमावले नाही.
पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई -
पाकिस्तान संघाने विश्वचषकात दोन सामने जिंकून शानदार सुरुवात केली. नेदरलँड आणि श्रीलंका यांचा पराभव करत पाकिस्तान संघाने वादळी सुरुवात केली. पण पाकिस्तानचे गोलंदाज धावा खूप खर्च करत असल्याचे आकिब यांनी सांगितले. श्रीलंकाविरोधात पाकिस्तान संघाने 344 धावा खर्च केल्या होत्या. 1992 चा विश्वचषक विजेता आकिब म्हणाला की, हसन अली नवीन चेंडूने अद्याप प्रभावी ठरलेला नाही. शाहीन शाह आफ्रिदी फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे पाकिस्तान संघ अडचणीत आला आहे. हसन अली याने श्रीलंकेविरुद्ध 10 षटकात 71 धावा खर्च करत 4 विकेट घेतल्या. आशिया कपमध्ये भारतीय फलंदाज शाहीन आफ्रीदीला बचावात्मक खेळत होते. पण नसीम शाह नसल्याचा फायदा भारतीय घेऊ शकतात.
वनडे विश्वचषकात भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ -
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.