IND vs PAK World Cup 2023 : विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शनिवारी अहमदाबादच्या रणांगणात भारत आणि पाकिस्तानचे शिलेदार एकमेंकासमोर उभे ठाकणार आहेत. या महामुकाबल्यात टीम इंडियाकडे दबावाचा सामना करण्याचा पुरेसा अनुभव असेल. भारतीय संघातील नऊ शिलेदारांनी विश्वचषकात पाकिस्तानचा सामना केला आहे.  2015 आणि 2019 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करण्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा सिंहाचा वाटा होता. दोघांनी पाकिस्तानचा समाचार घेतला आहे.2015 च्या विश्वचषकात विराट कोहलीने 107 धावांची झंझावती खेळी केली होती. तर 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने 140 धावांची वादळी खेळी केली होती. 2015 मध्ये विराट कोहलीला तर 2019 मध्ये रोहित शर्माला पाकिस्तानविरोधात सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 


पाकिस्तानविरोधात तीन विश्वचषकात खेळण्याचा विराटकडे अनुभव - 


मागील तीन विश्वचषकात विराट कोहली पाकिस्तानविरोधात खेळला आहे. भारताच्या सध्याच्या संघातील विराट कोहली सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात विश्वचषकात तीन सामने खेळले आहेत.  2011 सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरोधात नऊ धावांची खेळी केली होती. 2019 च्या विश्वचषकात विराट कोहलीने 77 धावांची महत्वाची खेळी केली होती. 2015 मध्ये विराट कोहलीने शतक केले होते. रोहित शर्माने 2015 मध्ये पाकिस्तानविरोधात 15 धावांची खेळी केली होती. तर 2019 मध्ये 140 धावांचा धमाका केला होता. 


2015 विश्वचषकात शामीने पाकिस्तानच्या दांड्या उडवल्या - 


रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय पाकिस्तानविरोधात विश्वचषकात अन्य सात खेळाडूही खेळले आहेत. रविंद्र जाडेजा (2015), रविचंद्रन अश्विन (2015), मोहम्मद शामी (2015), केएल राहुल (2019), हार्दिक पांड्या (2019), कुलदीप यादव (2019), जसप्रीत बुमराह (2019)  या खेळाडूंनाही पाकिस्तानविरोधात विश्वचषकात खेळण्याचा अनुभव आहे. 2015 विश्वचषकात पाकिस्तानविरोधात शामीने भेदक मारा केला होता. शामीने 35 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या होत्या.  केएल राहुल याने 2019 मध्ये 57 धावा करत सलामीला रोहित शर्माला चांगली साथ दिली होती. राहुल आणि रोहित यांनी पाकिस्तानविरोधात 136 धावांची भागिदारी केली होती. कुलदीप यादनने 2019 मध्ये 32 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या होत्या. त्यामध्ये बाबर आझम याच्या विकेटचाही समावेश आहे. 


पाकिस्तानचे 5 खेळाडू विश्वचषकात भारताविरोधात खेळलेत - 


पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्यासोबत पाच खेळाडू विश्वचषकात भारताविरोधात खेळले आहेत. सर्व 2019 च्या विश्वचषकात भारताविरोधात खेळले आहेत. त्यामध्ये बाबर आझम फखर जमान, इमाम उल हक, शादाब खान आणि हसन अली यांचा समावेश आहे. 2019 विश्वचषकात बाबर आझम याने भारताविरोधात 48 धावा केल्या होत्या.  फखर जमान याने 62 धावांची खेळी केली होती. इमाम सात धावा करुन बाद झाला. हसन अली आणि शादाब खान हे महागडे ठरले होते.  हसन अली याने 9 षठकात 84 धावा खर्च केल्या होत्या. तर शादाबने 61 धावा दिल्या होत्या.