Israel Hamas War : हमास आणि इस्रायलमधील युद्ध 11 व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या 'हमास' (Hamas) या कट्टरतावादी संघटनेने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने हल्ले सुरू आहेत. इस्रायल (Israel) आणि हमासमध्ये (Hamas) सुरू असलेल्या युद्धाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. या युद्धात आतापर्यंत 4200 हून अधिकजणांना प्राण गमावावे लागले आहे. यामध्ये सामान्य नागरीक, बालकांचाही समावेश आहे.
ब्रिटनमधील पॅलेस्टिनी मिशनचे प्रमुख हुसम जोमलोट यांनी म्हटले आहे की गाझामध्ये मृतांची वास्तविक संख्या जास्त आहे. मदत आणि बचाव पथक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. या युद्धामुळे मध्यपूर्वेत संघर्ष वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
इस्रायली सैन्य गाझामध्ये जमिनीवरून हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याआधी इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे.
लेबनॉनच्या सीमेवरून तुरळक हल्ले
लेबनॉन देशाच्या सीमेवरून हमासला हिजबुल्ला या अतिरेकी संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. इस्त्रायली सीमेवर हिजबुल्लाहकडून तुरळक प्रमाणात हल्लेही केले जात आहेत. या हल्ल्याला इस्रायली लष्कर प्रत्युत्तर देत आहे.
बुधवारी बायडन इस्रायलमध्ये येणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे बुधवारी इस्त्रायलच्या दौऱ्यावर येणार आहेत. हमासच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात इस्त्रायलसोबत एकजूट दाखवण्यासाठी आपण इस्त्रायलच्या दौऱ्यावर येत असल्याचे बायडन यांनी सांगितले.
इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार
वृत्तसंस्था 'एपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा एक प्रमुख कमांडर मारला गेला असल्याचे हमासच्या लष्करी विभागाने म्हटले आहे. हमासची लष्करी शाखा, अल-कसाम ब्रिगेड्सने मंगळवारी सांगितले की, मध्य गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात सर्वोच्च कमांडर अयमान नोफाल ठार झाला आहे. नोफल हा गाझा येथे इस्त्रायली बॉम्बहल्ल्यामध्ये मारला गेलेला सर्वात महत्त्वाचा कमांडर आहे.
गाझामध्ये अन्नाचे संकट अधिक गडद
गाझामधील गहू आणि पिठाचा साठा झपाट्याने कमी होत आहे आणि अंडी, ब्रेड आणि भाज्यांचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जे पाणी शिल्लक आहे ते पिण्यायोग्य नाही. अनेकांना शेती विहिरींचे क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. गाझामध्ये सध्या उपलब्ध असलेले पाणी पिल्याने रोगराईचा धोका असल्याचे मानवाधिकार संघटनांनी म्हटले आहे.