South Africa vs Netherlands World Cup 2023 : अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करत यंदाच्या विश्वचषकात पहिला उलटफेर केला. आता दुसरा उलटफेर नेदरलँड्सचा संघ करण्याची शक्यता आहे. पावसामुळे नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 43 षटकांचा करण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. 43 षटकांमध्ये नेदर्लंड्स संघाने 8 बाद 245 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने नाबाद 78 धावांची सर्वोत्तम खेळी केली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 247 धावांचे आव्हान आहे. नेदरलँडच्या गोलंदाजांनी कमाल केली तर विश्वचषकातील दुसरा उलटफेर होऊ शकतो.  नेदरलँडने अखेरच्या दहा षटकांमध्ये 122 धावांचा पाऊस पाडला.  


धरमशाला स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि नेदर्लंड्स यांच्यातील हा सामना  43 षटकांचा करण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली.  27 षटकात नेदरलँड्सला सहा विकेटमध्ये फक्त 112 धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर कर्णधार एडवर्ड याने वादळी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. एडवर्ड्सव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीवीर मध्यक्रम आणि तळातील फलंदाजांमध्ये एकालाही 30 धावांची खेळी करता आली नाही. रोलोफ वॅन डर मर्वी याने 29 धावांचे योगदान दिले.  दक्षिण आफ्रिकेसाठी लुन्गी एनगिडी, कागिसो रबाडा आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.



 नेदरलँडची खराब सुरुवात, कर्णधाराने डाव सावरला - 


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामी फलंदाज विक्रमजीत सिंह 16 चेंडूत दोन धावा काढून बाद झाला. मॅक्स ओडाउड 25 चेंडूत 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर तुफान फॉर्मात असलेला बेस डी लीडे याला सात चेंडूत दोन धावा करता आल्या.  


40 धावांत नेदरलँडच्या तीन विकेट गेल्या होत्या. कॉलिन एकरमैन आणि साइब्रँड एंजलब्रेट यांनी संयमी फलंदाजी सुरु ठेवली होती. पण दोघांना जास्तवेळा खेळपट्टीवर टिकात आले नाही. एकरमैन 25 चेंडूत 13 आणि एंजलब्रेट 37 चेंडूत 19 धावा काढून बाद झाले. त्यानंतर संघाच्या 112 धावा झाल्यानंतर तेजा निदामनुरू  20 धावांवर बाद झाला. 112 धावांत सहा विकेट अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर वैन बीक याच्या फलंदाजीमुळे नेदरलँडच्या आशा पल्लवीत झाली होत्या. पण तोही दहा धावा काढून तंबूत परतला. 34 व्या षटकात 140 धावांवर नेदरलँडला सातवा धक्का बसला होता. नेदरलँडचा संघ 170  च्या आत बाद होणार असेच वाटले होते. पण स्कॉट एडवर्ड्स आणि रॉल्फ वान डर मर्व यांनी वादळी फलंदाजी केली.  रॉल्फ वान डर मर्व याने 19 चेंडूमध्ये तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने 69 चेंडूमध्ये दहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 78 धावा चोपल्या. त्याच्यासोबत आर्यन दत्त यानेही फटकेबाजी केली. आर्यन दत्त याने नऊ चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या.