Pakistan Cricket Team Players Suffering From Viral Fever : बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेत नाहीत. आधी भारताकडून पराभव झाल्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. त्यातच आता अनेक खेळाडू तापामुळे बेजार झाले आहेत. त्यामुळे सराव सत्रही रद्द करावे लागले आहे. पाकिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होत आहे. त्याआधीच अनेक खेळाडू तापाने फणफणले आहेत. बाबर आझमच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी बेंगलोरमध्ये सामना होणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तान संघातील काही खेळाडू आजारी पडल्याचे वृत्त समोर आले आहे. संघातील काही खेळाडूंना तापाने बेजार केले आहे. दरम्यान, बेंगलोरमध्ये पाकिस्तानचा संघ डिनरसाठी बाहेर गेल्याचा व्हिडीओही सोमवारी व्हायरल झाला होता. अहादाबदमधील सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ रविवारी बेंगलोरमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर आता पाकिस्तानचे खेळाडू आजारी असल्याचे समोर आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या काही खेळाडूंना तापाने हैराण केले आहे. आज सकाळी पाकिस्तान संघाचं सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वसीम ज्युनिअर याने कसून सराव केला. पण इतर प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते. काही महत्वाच्या खेळाडूंना ताप आल्याचे समजतेय. त्यामुळे सकाळचे सराव सत्र रद्द करावे लागले. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानसाठी शतक झळकावणारा स्टार सलामीवीर अब्दुल्ला शफीकची सध्या प्रकृती ठीक नाही. त्याशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या तापातून बरा झाला आहे. याशिवाय संघातील इतरही अनेक खेळाडूंची तब्येत बिघडली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
भारताविरोधात मोठा पराभव -
बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला शनिवारी विश्वचषकात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात त्यांना सात विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाकिस्तानला 117 चेंडू आणि सात विकेट राखून सहज पराभव केले. या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या नेटरनरेटमध्ये मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानचा रनरेट प्लसमधून मायनसमध्ये गेला आहे. दोन विजय आणि एका पराजयासह पाकिस्तान सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. पण रनरेट -0.137 असा झाला आहे.
गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर -
पाकिस्तानचा पराभव करत शनिवारी भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतायी संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. पण भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे भारत टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला.
पाकिस्तानचं स्क्वाड
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी, मोहम्मद वसीम.