गाझापट्टी (पॅेलेस्टाईन) : इस्त्रायलवर हमासकडून (Israel-Hamas conflict) करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्याची मोठी किंमत गाझापट्टीतील सर्वसामान्य जीवांना चुकवावी लागली आहे. इस्त्रायलकडून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा घनघोर पद्धतीने गाझापट्टीत हल्ले सुरु असून अनेक पॅलेस्टिनी मृत्यूमुखी पडले आहेत. इस्त्रायलकडून गाझापट्टीत नागरी वस्त्या टार्गेट करण्यात आल्या. गाझापट्टीमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जबिलीया निर्वासित छावणीवर सुद्धा इस्त्रायलकडून हल्ला करण्यात आला.
वरून बाॅम्बवर्षाव खालून नाकाबंदी
इस्त्रायलकडून वरून बाॅम्बवर्षाव सुरु असतानाच जमिनीवरूनही पूर्णत: नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पाणी, लाईट, खाद्यपुरवठा तोडण्याचे आदेश इस्त्रायलकडून देण्यात आले आहेत. फक्त तीन दिवसात गाझापट्टीत 1 लाख 20 हजारांवर विस्थापित झाले आहेत. दुसरीकडे, इस्त्रायलकडून एक लाखां राखीव तुकडी गाझापट्टीवर तैनात केली आहे. याठिकाणी हमासकडून 130 इस्त्रायलींना ओलीस ठेवल्याचे बोलले जात आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 510 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इस्त्रायलमध्ये 800 जणांचा मृत्यू झाला आहे.
हमास सैनिक आणि इस्रायली सैन्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायली स्थायिकांनी अल-अक्सा मशिदीच्या कंपाऊंडवर हल्ला केल्यानंतर तसेच इस्रायलकडून विक्रमी संख्येने पॅलेस्टिनी मारले गेल्यानंतर हमासकडून हल्ला करण्यात आला आहे. दक्षिण इस्रायलमधील तीन मुख्य भागात हमास सैनिक आणि इस्रायली सैन्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. कर्मियामधील किबुट्झ येथे आणि अॅश्केलॉन आणि सेडरॉट शहरांमध्ये हा संघर्ष सुरु आहे.
100 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले
हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गाझामध्ये 100 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवले आहे. हमास अधिकारी मौसा अबू मारझौक यांनी रविवारी अरबी भाषेत ही माहिती दिली. वरिष्ठ इस्रायली अधिकारी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आहेत, असाही दावा केला आहे. हल्ला रोखण्यात अयशस्वी झाल्याने प्रश्नांचा भडिमार होत असलेल्या इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, त्यांनी गाझाच्या सीमेवरील बहुतेक भागांवर नियंत्रण मिळवले आहे, शेकडो लोकांना ठार केले आणि डझनभर कैदी म्हणून घेतले आहेत.
इराणने हल्ल्यास मदत केल्याचा दावा
इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या देशाने गाझाजवळ 100,000 राखीव सैन्य जमा केले आहे. दुसरीकडे, वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातही मोठा दावा करण्यात आला आहे. इराणने हमासला आठवड्याच्या शेवटी इस्रायलविरूद्ध अचानक हल्ल्याची योजना आखण्यास मदत केली, परंतु संयुक्त राष्ट्रातील इराणच्या मिशनने सांगितले की इराण हल्ल्यांमध्ये सामील नाही. इराणच्या मिशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पॅलेस्टाईनच्या अखंड समर्थनात ठामपणे उभे आहोत, तथापि, आम्ही हल्ल्यात सहभागी नाही कारण तो केवळ पॅलेस्टाईनने केला आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या