Iran Bomb Blast : इराणच्या केरमन शहरात बुधवारी झालेल्या दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात 73 जणांचा मृत्यू झाला आहे तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुड्स फोर्सचा प्रमुख इराणचे माजी लष्कर जनरल कासिम सुलेमानी (General Qassem Soleimani) याच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्याच्या समाधीच्या ठिकाणी लोक जमले होते. त्यावेळी हे स्फोट झाले. हा आत्मघाती हल्ला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख कासिम सुलेमानी याच्या मृत्यूला चार वर्षे झाल्याच्या निमित्ताने त्याच्या समाधीच्या ठिकाणी अनेक लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी जमा झाले होते. त्याचवेळी हे बॉम्बस्फोट झाले. 2020 मध्ये बगदादमध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुलेमानी मारला गेला होता.
चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी
इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने याआधी स्फोटांमुळे 120 लोक जखमी झाल्याची माहिती दिली होती. या स्फोटामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी मोठ्या संख्येने रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. जमावामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सुलेमानीच्या मृत्यूच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित समारंभासाठी परिसरात गर्दी जमली होती. सुलेमानी याने दोन दशकांहून अधिक काळ इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (Revolutionary Guard's elite Quds Force IRGC) ची विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचे नेतृत्व केले.
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानीचा मृत्यू
इराणमध्ये सुलेमानीला नॅशनल हिरो समजलं जातं. इराणमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत त्याचं नाव होतं. सुलेमानी हा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचा प्रमुख होता. 3 जानेवारी 2020 रोजी सुलेमानी याने सीरियाला भेट दिली. तेथून तो इराकची राजधानी बगदादला पोहोचला. पण त्याच्या या भेटीची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएला मिळाली होती.
सुलेमानीचे समर्थक शिया संघटनेचे अधिकारी त्याला घेण्यासाठी विमानाजवळ पोहोचले. एका गाडीत जनरल कासिम आणि दुसऱ्या गाडीत शिया लष्करप्रमुख मुहांदिस होते. सुलेमानीची कार विमानतळावरून बाहेर पडताच रात्रीच्या अंधारात अमेरिकन एमक्यू-9 ड्रोनने त्यावर क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सीआयएने हे अभियान राबवल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये इराणने अमेरिकेसोबतच्या अणु करारातून माघार घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती. तेव्हा कासिमने प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केलं आहे, आता आम्ही ते संपवू. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.
इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने अमेरिकेला सुलेमानीच्या भेटीची ठोस माहिती दिली होती असा दावा इराणने केला आहे.