Iran Pakistan Conflict : इराण (Iran) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात वाढता तणाव पाहायला मिळत आहे. इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी 9 पाकिस्तानींची गोळ्या झाडून हत्या केली. एकीकडे इस्लामाबाद आणि तेहरान यांच्यातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इराणच्या अशांत दक्षिण-पूर्व सीमा भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी नऊ पाकिस्तानी कामगारांची हत्या केली. शनिवारी 27 जानेवारीला ही घटना घडली आहे.


इराण आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव! 


या घटनेच्या सुमारे एक आठवडा आधी, इराण आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यामध्ये दोन मुलांसह सुमारे 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, इराणमधील दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण आणि घृणास्पद हत्येबाबत इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. इराणच्या वृत्तसंस्थेने याबाबत बातमी दिली आहे.


अज्ञात हल्लेखोरांकडून 9 पाकिस्तानींची हत्या


इराणच्या मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, सिस्तान-बलुचे प्रांतातील सरवान शहरातील सिरकान परिसरात अज्ञात सशस्त्र लोकांनी नऊ गैर-इराणी नागरिकांची हत्या केली आहे. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, मारले गेलेले सर्व परदेशी नागरिक होते. दरम्यान, तेहरानमधील पाकिस्तानचे राजदूत मुद्दसिर टिपू यांनी पुष्टी केली की, सर्व मृत पाकिस्तानी नागरिक आहेत. मुद्दसिर टिपू म्हणाले की, "सरवानमध्ये 9 पाकिस्तानींच्या भीषण हत्येने खूप धक्का बसला आहे. दूतावास शोकग्रस्त कुटुंबांना पूर्ण मदत करेल. आम्ही इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे."






इराण आणि पाकिस्तानचा क्षेपणास्त्र हल्ला


पाकिस्तानी आणि इराणचे राजदूत परत बोलावल्यानंतर त्यांच्या पोस्टिंगवर परतत असताना वाढत्या तणावादरम्यान ही घटना घडली. इराण आणि पाकिस्तानने गेल्या आठवड्यात एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. दोन्ही देशांनी आपले लक्ष्य दहशतवादी असल्याचे सांगितले होते. इराणने पाकिस्तानातील जैश अल-अदलच्या तळांवर हल्ला केला. 16 जानेवारी रोजी, इराणने पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील पंजगुर या सीमावर्ती शहरामध्ये दहशतवादी गट जैश अल-अदलच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करून हल्ले केले, ज्याचा इस्लामाबादने तीव्र निषेध केला आणि राजनैतिक संबंध कमी केले. या घटनेच्या 48 तासांनंतर पाकिस्तानने गुप्तचर ऑपरेशनमध्ये, इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) या दहशतवादी संघटनांनी वापरलेल्या लक्ष्यांवर हल्ला केला.


पाकिस्तानच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती 


पाकिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी सांगितलं की, इराणमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांच्या मृत्यूच्या बातमीने दु:ख झालं आहे. जिलानी म्हणाले, "हा घृणास्पद हल्ला म्हणजे पाकिस्तान आणि इराणमधील संबंध बिघडवण्याचा आमच्या समान शत्रूंचा प्रयत्न आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत इराण सरकारला कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे."