Nazanin Zaghari Ratcliffe :  जवळपास सहा वर्षांपासून इराणच्या तुरुंगात असलेल्या छळाचा धैर्याने सामना केल्यानंतर नाजनीन जगारी रॅटक्लिफ ब्रिटनमध्ये परतली आहे. नाजनीनने इराणच्या तुरुंगात क्रूर यातनांचा सामना केला होता. नाजनीनच्या सुटकेवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आनंद व्यक्त केला. 


इराणी-ब्रिटीश नागरीक असलेल्या नाजनीन रॅटक्लिफला 3 एप्रिल 2016 रोजी इराणच्या सुरक्षा दलाने तिला ताब्यात घेतले. इराण सरकारविरोधात कट रचण्याच्या आरोपात तिला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपल्या आई-वडिलांना भेटल्यानंतर नाजनीन आपली मुलगी ग्रॅबिएलासह ब्रिटनला परतण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ग्रॅबिएला फक्त एका वर्षाची होती. 


तेहरान विमानतळावर इराणच्या रिव्होल्यूशन गार्डने नाजनीनला ताब्यात घेतले होते. कोणतीही कायदेशीर मदत न देता नाजनीनला 45 दिवसानंतर हेरगिरीच्या आरोपात पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर तिचा पती रिचर्ड याने तिच्या सुटकेसाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. वृत्तवाहिनी, टॉक शोच्या माध्यमातून त्याने आपल्या पत्नीच्या बेकायदेशीर अटकेवर आवाज उठवला. 


इराणच्या तुरुंगात नरकयातना सहन कराव्या लागल्या होत्या असे नाजनीनने सांगितले. डोळ्यांवर अनेक दिवस पट्टी बांधून ठेवणे, डोळ्यांवर तीव्र प्रकाशझोत मारणे, साखळीला बांधून ठेवण्यासारखे अत्याचार तिच्यावर करण्यात आले. त्याशिवाय, अनेक रात्री नाजनीनला झोपूनही दिले नव्हते. नाजनीन रॅटक्लिफने जुलै 2019 मध्ये शिक्षेविरोधात उपोषण सुरू केले होते. त्यानंतर तिला एका रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात दाखल केले. या विभागात मनोरुग्णांवर उपचार केले जात होते. जवळपास एक आठवडा तिला बेडला बांधून ठेवण्यात आले होते. तुरुंगातील छळाने तिचा रुग्णालयातही पाठलाग केला. रुग्णालयातही तिचा छळ सुरू होता. 


इराणचे सर्वोच्च नेते हसन रुहानी रॅटक्लिफच्या सुटकेआधी अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या इराणी नागरिकांच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र, सहा वर्षाच्या लढाईनंतर अखेर नाजनीनची सुटका करण्यात आली. नाजनीनचा पती रिचर्ड रॅटक्लिफने तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानले. आम्ही आमच्या मुलीसह नवीन आयुष्य सुरू करणार असल्याचे रिचर्ड रॅटक्लिफ यांनी सांगितले.