Iran Firing : इराणमधून (Iran) एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणमधील (Firing In Iran) सेंट्रल मार्केटमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इराणच्या IRNA वृत्तवाहिनीने ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम इराणमधील इजेह शहरात (Izeh City) गोळीबाराची ही घटना घडली. येथील मार्केटमध्ये हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, या घटनेची माहिती देताना, वृत्तसंस्था IRNA ने सांगितले की, हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये पोहोचले आणि तिथल्या जनतेवर तसेच सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्यात पाच लोक ठार झाले आणि किमान 10 जखमी झाले. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.







26 ऑक्टोबर रोजी शिराज शहरात गोळीबार
इराणमध्ये अलीकडच्या काळात देशव्यापी निदर्शने होत आहेत, सुरक्षा दल आंदोलकांवर कारवाई करतानाही दिसत आहे. निदर्शनांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही झाल्या आहेत.  गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी इराणच्या शिराज शहरातही गोळीबाराची बातमी समोर आली होती. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला होता तर 40 जण जखमी झाले होते. येथे 3 हल्लेखोरांनी जमावावर गोळीबार केला. शिया समुदायाचे पवित्र स्थान शाह चेराग येथे ही घटना घडली. या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.



महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये परिस्थिती बिघडली
महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये परिस्थिती बिघडल्याचं दिसून आलं. गेल्या दोन महिन्यांत या निदर्शनांमध्ये अनेक चकमकी झाल्या आहेत, ज्यात अनेक लोकं मारले गेले आहेत. अमिनीला 13 सप्टेंबरला हिजाब व्यवस्थित न घातल्यामुळे अटक करण्यात आली होती. तीन दिवसांनंतर म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशातील परिस्थिती बिकट होताना दिसत आहे. इराणमधील जनता सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, जाणून घ्या दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी