Todays Headline: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा पहिलाच स्मृतिदिन असल्यामुळे दोन्ही गटाकडून अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोल्यामध्ये येणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे.  आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचे काय होणार याचे उत्तरही या सुनावणीत मिळणार आहे. सोबत बीएमसीच्या प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जायला सांगितलं होतं, त्याबाबत हायकोर्टातही उद्याच सुनावणी होणार आहे.


उद्धव ठाकरे शिवतिर्थावर -
आज बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतिदिन आहे. ठाकरे गटांचे नेते, आमदार, खासदार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गटाने स्मृतिदिनाच्या एक दिवस आधीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं आहे.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.   उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती वर्षा गायकवाड, आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचीही उपस्थिती असणार आहे. दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम धारावी परिसरातील शीव – वांद्रे लिंक रोड नजीक असणा-या संत रोहिदास मार्गावरील ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन व काळा किल्ला नजिक हा कार्यक्रम आयोजित होणार आहे.


अनिल अंबानींना न्यायालयानं दिलासा आज संपतोय, सुनावणी होणार -
रिलायन्स (एडीए) समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला तात्पुरता दिलासा आज संपतोय. अनिल अंबानींविरूद्ध पाठवलेल्या नोटीसवर सध्या कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश आयकर विभागाला दिले होते आपल्या स्विस बँकेतील खात्यात 814 कोटींच्या ठेवी दडवून ठेवत 420 कोटींची करचुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागानं अनिल अंबानींना 8 ऑगस्ट रोजी नोटीस पाठवली होती. ज्याला अंबानींनी हायकोर्टात आव्हान दिलंय ज्यावर आज सुनावणी होईल. 


राहुल गांधींची भारत जोडो यात्रा -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राने अकोला जिल्ह्यात प्रवेश केला आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर येथील साईबाबा जिनिंग फॅक्टरी येथे बुधवारी राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम होणार आहे. आज सकाळी पातूरातून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. यासोबतच 17 नोव्हेंबरला राहुल गांधी यांचा मुक्काम बाळापुर तालुक्यातील बाग फाटा येथे असेल.  राहुल गांधींच्या पदयात्रेच्या मार्गावरील सर्व ठिकाणी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. अकोला जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पातुर, देऊळगाव, वाडेगाव, बागफाटा, बाळापूर या मार्गे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला जाणार आहे.   


आष्टी - नगर रेल्वेच्या दररोज होणार दोन फेऱ्या..
गेल्या तीन वर्षापासून प्रतिक्षेत असलेली अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचे अहमदनगर-न्यू आष्टी प्रवासी रेल्वे वाहतूकचे नुकतेच केंद्रीय रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे, उपमुख्यमंञी देवेंद्र फडवीस, पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता. सुरूवातीला ही अहमदनगर-न्यू आष्टी अशी एकच फेरी होती. आता पुन्हा एक फेरी वाढवून सकाळी अन् संध्याकाळी दोन फे-या आजपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे अहमदनगरहून मुंबई-पुणे जाण्यासाठी आष्टी,जामखेड करांची सोय होणार आहे..


अहमदनगर- न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा, माननीय  रेल राज्य मंत्री यांच्या कडून  हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
रावसाहेब दानवे, माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या आदरणीय उपस्थितीत  अहमदनगर- न्यू आष्टी आणखी एक नवीन डेमू (DEMU) रेल्वे  सेवेला अहमदनगर रेल्वे स्टेशन स्थानकाहून, आज दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. 


61 व्या राज्य नाट्य स्पर्धेला उद्यापासून नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात सुरुवात होणार असून एकूण २८ नाटके यात सादर होणार आहेत.


अनियारा नृत्याचा कार्यक्रम -
अभिजात नृत्य, नाट्य आणि संगीत अकादमीच्या वतीनं पंडित बिरजू महाराज यांना आदरांजली म्हणून कालिदास नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता अनियारा हा नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यात बिरजू महाराज यांच्या ज्येष्ठ शिष्या शाश्वती सेन या एकल नृत्याविष्कार सादर करणार आहेत. प्रथमच त्या नाशिकला येणार असल्याने रसिकांना ही एक पर्वणी ठरणार आहे. 


मुख्यमंत्री ईडी कार्यालयात जाणार का?
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलवलं आहे. झारखंडमधील राजकीय वातावरण तापलं आहे. यूपीएच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी सकाळी घरी बोलवलं आहे. मागील काही दिवसांपासून सोरेन यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात येत आहे, मात्र ते ईडी कार्यलायत उपस्थित राहिले नाही.