International Mens Day 2022 : 'महिला दिना'प्रमाणेच, 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' (International Mens Day 2022) दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. हाच दिवस आहे जेव्हा समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे, जे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित करतात. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास आणि हेतू नेमका काय ते जाणून घेऊयात.


आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास :


आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा 19 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा वार्षिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. याची सुरुवात 7 फेब्रुवारी 1992 रोजी थॉमस ऑस्टर यांनी केली होती. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या प्रकल्पाची कल्पना एक वर्षापूर्वी 8 फेब्रुवारी 1991 रोजी करण्यात आली होती. यानंतर 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला.


भारतात पहिल्यांदा 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. भारतात 8 मार्च 1923 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानंतर भविष्यात कधी पुरुष दिनाची आवश्यकता भासेल असे कोणाला वाटलेही नसेल. परंतु, हळूहळू लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी हा दिवसही साजरा होऊ लागला.


आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचं महत्व : 


पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जगात महिलांपेक्षा तीन पट जास्त पुरुष आत्महत्या करतात. 3 पैकी एक पुरुष घरगुती हिंसाचाराचा बळी आहे. पुरुष स्त्रियांपेक्षा 4 ते 5 वर्ष आधी मरण पावतात. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता दुप्पट असते. पुरुष दिन हा पुरुषांच्या ओळखीच्या सकारात्मक पैलूंवर काम करतो. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो. कुटुंब, समाज, समुदाय, समाज व्यवस्था या सर्वामध्ये पुरुषांच्या योगदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी प्रयत्न केला जातो.


महत्वाच्या बातम्या : 


Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस