Infosys : रशियाशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत, यासाठी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून निर्माण होत असलेल्या दबावाला भारत तरी अजून बळी पडलेला नाही. पण कदाचित या दबावाखाली येऊन एका भारतीय कंपनीने आता रशियातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने बुधवारी घोषणा केली की, ती आपला व्यवसाय रशियातून बाहेर काढत आहे.


याबाबत कंपनीने काय सांगितले?


इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख म्हणाले की, रशियामधील आमच्या सर्व केंद्रांमधून आम्ही आमचा संपूर्ण व्यवसाय रशियाबाहेर नेण्यास सुरुवात केली आहे. आमच्याकडे आता रशियामध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत. आम्ही कोणत्याही रशियन कंपनीसोबत काम करत नाही.


इन्फोसिसने हे पाऊल का उचलले?


रशियासोबत भारताचे संबंध खूप चांगले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात भारत अद्याप रशियाविरुद्ध काहीही बोललेला नाही. त्यामुळे अमेरिका आणि इतर देशही भारतावर दबाव आणत आहेत. एवढेच नाही तर रशियाने भारताला कमी किमतीत कच्चे तेल देऊ केले होते, ते भारताने स्वीकारले. याबाबत दबावही निर्माण झाला, पण भारत झुकला नाही. आता प्रश्न असा पडतो की अचानक एखादी कंपनी अशा प्रकारे आपला व्यवसाय गुंडाळून का बाहेर पडत आहे. यामागे कंपनीचे यूके कनेक्शन आहे, ज्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलणे भाग पडले आहे.


मुलगी आणि जावईवर प्रश्न उपस्थित


इन्फोसिसच्या या निर्णयामागील एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांचे जावई आणि त्यांच्या मुलीबाबत ब्रिटनमध्ये निर्माण होणारे प्रश्न.. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. ऋषी सनक यांची पत्नी आणि नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांची इन्फोसिसमध्ये सुमारे 1 अब्ज डॉलरची भागीदारी आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सनक यांच्यावर पत्नी अक्षता मूर्ती यांच्या इन्फोसिसमधील शेअर्सच्या माध्यमातून रशियाकडून आर्थिक फायदा मिळवल्याचा आरोप आहे. विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. हा वाद संपवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.