Indonesia Football Match Violence : इंडोनेशियाच्या (Indonesia) मलंग रीजेंसीच्या कंजुरुहान स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली. यात 129 जणांचा मृत्यू झाला. तर 180 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंडोनेशियातील एका स्टेडियममध्ये दोन संघांमध्ये सामना सुरु होता. एका संघानं सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. एएफपी वृत्तसंस्थेनं पोलिसांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केल्यानं सामना पाहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेनं पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंटाच्या हवाल्यानं सांगितलं की, स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला असून इतर जणांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  






Persebaya Surabaya ने इंडोनेशियातील Arema FC संघावर मात करत फुटबॉल सामना 3-2 अशा फरकानं जिंकला. त्यानंतर Arema FC चे चाहते नाराज झाले आणि त्यांनी एकच हल्लाबोल केला. Arema FC चे हजारो चाहते थेट स्टेडिअममधून मैदानात घुसले आणि त्यांनी तिथे हिंसाचार सुरु केला. तात्काळ स्ठाथिक पोलिसांना पाचारण करण्यात आलं. तसेच, इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे सदस्य मैदानात दाखल झाले आणि प्रतिस्पर्धी Persebaya Surabaya संघाच्या खेळाडूंना संरक्षण दिलं.  


यादरम्यान Arema FC च्या नाराज चाहत्यांनी खेळाडूंवर हल्ला केला. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये पोलीस हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पोलिसांकडून संतप्त जमावावर लाठीचार्ज करत असून परिस्थितीवर नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडताना दिसत आहेत. 


व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं लोक मैदानात घुसून इकडे-तिकडे फुटबॉल फेकताना दिसत आहेत. त्याचवेळी पोलीस मध्यस्थी करण्यासाठी मैदानात धाव घेताना पाहयला मिळच आहे. तसेच, लाठीचार्ज करुन जमाव पांगवण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळच आहे. यादरम्यान काही लोक कट्ट्यावर लटकलेले दिसतात तर काही सीटच्या दिशेने धावताना दिसत आहेत.