Joe Biden on Russia : रशियानं (Russia) युक्रेनचे (Ukraine) चार भाग व्यापले आहेत. हे चार भाग रशियाचा औपचारिक भाग असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. त्यानंतर अमेरिका (America) चांगलीच आक्रमक झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe biden) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन  (Russian President Vladimir Putin)  यांना इशारा दिला आहे. नाटो (NATO) देशांची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ देणार नसल्याचे बायडन यांनी म्हटलं आहे. पुतिन यांनी गैरसमज करुन घेऊ नये, आम्ही नाटोच्या पाठीशी उभे असल्याचे बायडन यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, अमेरिका पुतिन आणि त्यांच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे देखील जो बायडन यांनी म्हटलं आहे. पुतिन हे त्यांच्या शेजाऱ्यांचा प्रदेश ताब्यात घेऊ शकत नाहीत. आम्ही युक्रेनला लष्करी उपकरणे पुरवत राहू असेही त्यांनी म्हटलं आहे. नाटो देशांच्या हद्दीतील प्रत्येक इंच जमिनीचं संरक्षण करण्यासाठी अमेरिका पूर्णपणे तयार असल्याचे बायडन म्हणाले. आम्ही नाटो सहयोगींच्या पाठीशी उभे असल्याचे बायडन यांनी म्हटलंय. युक्रेनचा भूभाग जोडण्याच्या रशियाच्या प्रयत्नांबद्दल बायडेन म्हणाले की, युक्रेनचा सार्वभौम भूभाग जोडण्याच्या रशियाच्या प्रयत्नांचा युनायटेड स्टेट्स निषेध करते. रशिया आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहे. मी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी रशियाला जोडण्याचा बेकायदेशीर प्रयत्न नाकारावा. जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत युक्रेनच्या लोकांसोबत उभे राहावं असेही बायडेन म्हणाले.


रशियाने युक्रेनच्या चार क्षेत्रांवर कब्जा केला 


23 ते 27 सप्टेंबर दरम्यान रशियाने डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया आणि खेरसन या युक्रेनच्या चार प्रदेशांवर कब्जा केला आहे. या चार प्रदेशातील बहुतांश लोकांनी रशियासोबत येण्याच्या बाजूने मतदान केल्याचा दावा रशियानं केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोनेत्स्कमध्ये 99.2 टक्के, लुहान्स्कमध्ये 98.4 टक्के, झापोरिझियामध्ये 93.1 टक्के आणि खेरसनमध्ये 87 टक्के लोकांनी रशियासोबत जाण्याच्या बाजूने मतदान केल्याचा दावा रशियानं केला आहे. 


युक्रेनने NATO कडे अर्ज केला 


रशियाने युक्रेनच्या 4 भागांवर कब्जा केल्यानंतर युक्रेनने NATO देशांकडे अर्ज केला होता. त्यानंतर अमेरिकेनं रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे वर्णन 'दहशतवादी देश' असे केले आहे. युक्रेनने नाटो देशांच्या यादीत सामील होण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत.


काय आहे NATO ?


नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ही जगातील 29 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी 12 राष्ट्रांनी केली होती. नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये आहे. या देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, यूके आणि फ्रान्ससारख्या देशांचा समावेश आहे. सध्या नाटोची सदस्य संख्या 30 आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये रशियाच्या वाढत्या विस्ताराला पायबंद घालणं हा खरंतर नाटोचा मुख्य उद्देश होता. युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नाही. पण तो 'भागीदार देश' आहे. म्हणजेच भविष्यात कधीतरी या देशालाही नाटोचा सदस्य होता येऊ शकतं. याला रशियाचा आक्षेप आहे. युक्रेनच्या बाबतीत असं काही होणार नाही, याची हमी रशियाला पाश्चात्य देशांकडून हवी आहे. मात्र, अमेरिकेनं युक्रेनला नाटोचं सदस्यत्व घेण्यापासून रोखायला नकार दिला आहे. युक्रेन हा सार्वभौम देश आहे आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणासोबत भागीदारी करायची याचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, अशी भूमिकाही अमेरिकेनं घेतली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: