Indonesia Earthquake : इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ता भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती मिळत आहे. इंडोनेशियातील प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र सियांजूर, पश्चिम जावा येथे 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होतं. तसेच, यामुळे त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं. भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 300 लोक जखमी झाले आहेत.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी भयभीत झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी भूकंप झाला.
भारतातही गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्का जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी येथे बुधवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 4.1 मोजली गेली होती. अरुणाचल प्रदेशात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 9.55 च्या सुमारास हे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी होती.
जपानमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानं लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, घरांतील वस्तूही खाली पडल्या होत्या. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
भूकंपाचे धक्के जाणवण्यामागे वैज्ञानिक कारण काय?
भूकंपाचं वैज्ञानिक कारण समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्या खाली द्रवरूप लाव्हा आहे आणि त्यावर टॅक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. काही वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे अनेक वेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यावर या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून बाहेर येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. यामुळे जेव्हा डिस्टर्बेंस निर्माण होतो आणि भूकंप होतो.
भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?
भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.