Baby Ariha Case: लहान मुलांचे लाड करणं,त्यांना आपल्या हातांनी भरवणं या सगळ्या गोष्टी फार प्रेमाने आपल्याकडे प्रेमाने केल्या जातात. पण जर्मनीमध्ये (Germany) या सगळ्या गोष्टी करणं कायद्यानं गुन्हा आहे. आपल्या हातांनी मुलांना भरवणं म्हणजे मुलांच्या आरोग्याची हेळसांड करणं आहे असं जर्मनीत मानलं जातं. जर पालक या गोष्टी करतातना आढळून आले तर त्यांच्यापासून त्यांचे बाळ लांब केले जाते. त्याची विशेष काळजी घेण्यासाठी त्यांना बाल संगोपन गृहामध्ये ठेवले जाते. त्यामुळे जर्मनीमध्ये बाळाच्या बाबतीतली छोटीशी चूक देखील पालकांना महाग पडते.
नुकतचं जर्मनीमधल्या अशाच एका प्रकरणामध्ये भारतातील विविध पक्षातील खासदारांनी एकजूट दाखवली आहे. जर्मनीमधील स्थित एका भारतीय कुटुंबातील मुलीसाठी भारतातील खासदारांनी जर्मनीच्या राजदूतांना पत्र लिहिले आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांनी जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिप अकरमन यांना पत्र लिहिले आहे. तसेच 'आता विलंब केल्यास त्या मुलीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान होईल' असं खासदारांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
जर्मनीच्या सरकारने ज्या मुलीला बालसंगोपन गृहामध्ये ठेवले आहे तिचे नाव अरिहा शाह असे आहे. अरिहाचे पालक 2018 पासून जर्मनीमध्ये स्थित आहेत. परंतु तिला काही कारणास्तव दुखापत झाली होती. त्यानंतर अरिहाच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले,तेव्हा डॉक्टरांनी सर्व काही ठिक असल्याचं सांगितलं. परंतु त्यानंतर जेव्हा ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांच्यापासून अरिहाला हिरावून घेण्यात आले आणि तिला बालसंगोपन गृहामध्ये ठेवण्यात आले. 20 सप्टेंबर 2021 रोजी अरिहाला जर्मनीच्या बाल संगपोन गृहामध्ये ठेवले त्यावेळी ती अवघ्या सात महिन्यांची होती. जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी अरिहाचे आईवडील धरा आणि भावेश शाह यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
या खासदारांना लिहिले पत्र
या प्रकरणात खासदारांनी एकी दाखवत जर्मनच्या राजदूतांना पत्र लिहिले आहे. यामध्ये काँग्रेसकडून शशी थरुर आणि अधीर रंजन चौधरी, भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि मेनका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे, टीएमसीकडून महुआ मोईत्रा, समाजवादी पक्षाकडून राम गोपाल यादव,आरजेडीकडून मनोज झा,आम आदमी पक्षाकडून संजय सिंह,सीपीएमकडून इलामन करीम आणि जॉन ब्रिटस,अकाली दलाकडून हरसिमरत कौर, बसपाकडून कुंवर दानिश अली,ठाकरे गटाकडून प्रियांका चतुर्वेदी , सीपीआयकडून बिनॉय विश्वम आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून फारुख अब्दुल्ला या खासदारांना या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.
पत्रात काय म्हटलं आहे?
खासदारांनी या पत्रात लिहिले आहे की, 'भारतीय संसदेच्या दोन्ही गृहांचे सदस्या म्हणून आम्ही 19 पक्षांचे खासदार तुम्हाला पत्र लिहित आहोत. भारतातील दोन वर्षांची मुलगी तुमच्या बालसंगोपन गृहामध्ये आहे तिला तातडीने सोडण्याची विनंती आम्ही करत आहोत. ही मुलगी भारताची नागरिक असून धरा आणि भावेश शाह हे तिचे पालक आहेत. मुलीचे वडील तिथल्या एका कंपनीत काम करत असल्याने हे कुटुंब बर्लिनमध्ये राहत होते. हे कुटुंब आत्तापर्यंत भारतात यायला हवे होते, पण दुःखद घटनेमुळे ते येऊ शकले नाहीत.'
पुढे लिहिताना खासदारांनी म्हटले की, 'आम्ही तुमच्या कोणत्याही संस्थेवर आरोप करत नाही आणि आम्ही तुम्ही जे काही केले ते मुलीच्या हितासाठी केले हे आम्ही समजू शकतो. आम्ही तुमच्या देशातील कायदेशीर प्रक्रियेचा आदर करतो पण या कुटुंबाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसल्यामुळे मुलीला घरी परत पाठवण्यात यावे'
तसेच 'अरिहाच्या पालकांवर फेब्रुवारी 2022 कोणत्याही प्रकारचा आरोप सिद्ध न झाल्याने जर्मन पोलिसांनी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतले. परंतु त्यानंतरही मुलीला तिच्या पालकांकडे सोपवण्यात आले नाही', असं देखील खासदारांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. 'आमच्या संस्कृतीचे काही नियम आहेत.अरिहा ही जैन धर्माची असल्याने ती पूर्णपणे शाकाहारी आहे. पंरतु या मुलीला मांसाहाराचे जेवण दिले जात आहे.' असा आरोपही खासदारांनी या पत्रात केला आहे.
मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे
अशाच प्रकरणावर आधारित राणी मुखर्जी हिचा मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपट देखील आला होता. ज्यामध्ये राणी मुखर्जीने तिच्या मुलीला हाताने भरवल्यामुळे तिच्यापासून तिला हिरावून घेण्यात येते. ती मुलीला सांभाळण्यास असक्षम असल्याचं कारण तिला नॉर्वेच्या सरकारकडून देण्यात येतं. मुलांसोबत एका बेडवर झोपणं, त्यांना काजळ लावणं या सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने चुकीच्या आहेत आणि हेच कारण सांगून तिच्याकडून तिची दोन्ही मुलं हिरावून घेतली जातात. त्यानंतर मुलांचा ताबा परत मिळवण्यासाठीचा मिसेस चॅटर्जीचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: