Odisha Train Accident : ओडिशातील बालासोरमधील बहानगा रेल्वे स्टेशनजवळ तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात सुमारे 1000 लोक जखमी झाले. या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षांनी आता रेल्वेच्या 'कवच संरक्षण' प्रणालीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच रेल्वे मंत्र्यांच्या जुन्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे. यादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.


...तर ओडिशातील भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेच्या कवच संरक्षण प्रणालीबाबतचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी रेल्वे मंत्र्यांसोबतच केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्या दाव्यांवरून टीका केली आहे. या व्हायरल व्हिडीओवरून सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.


रेल्वेमंत्र्यांच्या दाव्यावर विरोधकांचा निशाणा


श्रीनिवास यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'जेव्हा एक ट्रेन रुळावरून घसरली आणि दुसऱ्या रेल्वे रुळावर आली, तेव्हा 'कवच' कुठे होतं? सुमारे 300 जणांचा मृत्यू, सुमारे 1000 लोक जखमी. या दुर्दैवी मृत्यूंना कोणी जबाबदार असेल का?'


पाहा व्हायरल व्हिडीओ :






रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'कवच' संरक्षण प्रणालीची म्हणजेच आर्मर प्रोटेक्शन टेक्नॉलॉजीबद्दल सांगत आहेत. याबद्दल समजावून सांगताना त्यांनी सांगितलं होतं की, 'कवच' सुरक्षा यंत्रणा ट्रेन अपघात धोका आणि ट्रेनची एकमेकांसोबतची टक्कर टाळण्यासाठी आहे. त्यांनी सांगितलं होतं की, आपात्कालीन परिस्थिती लोको पायलट ट्रेनवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर ट्रेनची 'कवच' ब्रेकिंग सिस्टीम आपोआप सक्रिय होईल. याशिवाय ही यंत्रणा दोन ट्रेनमधील टक्कर टाळण्यासही सक्षम आहे. 


काय आहे 'कवच' यंत्रणा?


ट्रेनमधील अपघात टाळण्यासाठी 'कवच' संरक्षण प्रणालीचा शोध लावण्यात आला. कोकण रेल्वेकडून 2002 पासून 'रक्षा कवच' या प्रणालीचा वापर करण्यास सरुवात झाली. त्यानंतर ही प्रणालीचं नावं 'कवच' या नावानं ओळखली जाऊ लागली. एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर आल्या तर अपघात टाळण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली होती. ही प्रणाली अद्याप सर्व ट्रेनमध्ये बसवण्यात आलेली नाही.


ओडिशातील भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता?


दरम्यान, कवच प्रणालीमुळे ओडिशातील रेल्वे अपघात टाळता आला असता का, असा सवाल उपस्थिती केला जात आहे. बालासोर येथील अपघात पाहता आतापर्यंत या मार्गावरील गाड्यांमध्ये 'कवच' यंत्रणा वापरली गेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा आणि अपघाताचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Odisha Train Accident : ओडिशामध्ये मृत्यूचं तांडव! ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु; 90 ट्रेन रद्द