US Canada Border : अमेरिका-कॅनडा सीमेजवळील मिनेसोटा राज्यात 19 जानेवारीला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या लोकांच्या एका गटाला ताब्यात घेतले आणि त्यातील चौघांचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मॅनिटोबा रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस (RCMP) ने सांगितले की, बुधवारी दक्षिण मध्य मॅनिटोबातील इमर्सन क्षेत्राजवळ अमेरिका-कॅनडा सीमेजवळ चार लोकांचे मृतदेह आढळले. यामध्ये दोन प्रौढ, एक अल्पवयीन आणि एक अर्भक यांचा समावेश असून ते भारतीय असल्याचं सांगितलं जात आहे. हे कुटुंब गुजराती असून प्रचंड थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.


अवैध मानवी तस्करीप्रकरणी अमेरिकन नागरिकाला अटक
बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्याच्या आरोपावरून अमेरिकेने सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर यामध्ये एका अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे. हे लोक बेकायदेशीररित्या घुसखोरी करत होते असे सांगितले जात आहेत. दरम्यान, 24 जानेवारीला सर्व मृत झालेल्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकावर कॅनडातून अमेरिकेत नागरिकांची अवैधरित्या तस्करी करण्यात मदत केल्याचा आरोप आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे सर्व लोकांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


या घटनेनंतर कॅनडातील भारतीय दूतावासाने एक टीम मॅनिटोबाला पाठवली आहे. ही टीम स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे आणि मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. तर, शिकागोमधील भारतीय दूतावासाने तात्काळ मिनियापोलिस येथे एक कॉन्सुलर टीम पाठवली आहे, जी या प्रकरणी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि अटक केलेल्या भारतीयांना कॉन्सुलर स्तरावर मदत देण्याचा प्रयत्न करत आहे.


वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी देखील यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस कस्टम्स आणि बॉर्डर पोलिस यांच्या सतत संपर्कात आहेत आणि अटकेत असलेल्या सर्व नागरिकांना शक्य ती सर्व मदत सुरू ठेवण्यास सांगत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha