Pralay Missile : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात आणि अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांगमध्ये (Tawang) चिनी सैन्यासोबत भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीमुळे भारताला (India) सीमा सुरक्षेसाठी मोठी पावले उचलावी लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारताकडून पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या (China) सीमेवर ‘प्रलय’ हे शक्तिशाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार आहे. हे क्षेपणास्त्र चीन आणि पाकिस्तानच्या भारतीय सीमेवर तैनात केले जाईल. दरम्यान, चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत सरकार सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. 


120 प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी
चीनसोबतचा सीमावाद आणि पाकिस्तानसोबतचे तणावपूर्ण संबंध असताना केंद्र सरकारने प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खरेदीचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने भारतीय सशस्त्र दलांसाठी सुमारे 120 प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. ही क्षेपणास्त्रे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.


देशासाठी मोठी प्रगती


प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीला हिरवा सिग्नल मिळणे ही देशासाठी मोठी प्रगती मानली जात आहे. भारताकडे आता धोरणात्मक भूमिकांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास परवानगी असणार आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने विकसित केलेले क्षेपणास्त्र आणखी विकसित केले जात असून लष्कराला हवे असल्यास त्याची रेंज लक्षणीयरीत्या वाढवता येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.


प्रलय क्षेपणास्त्र शक्ती


सध्या प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे 150 ते 500 किमीपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्षेपणास्त्रांचा शोध घेणे शत्रूसाठी खूप कठीण असणार आहे. 'प्रलय' हे जमिनीवरून मारा करणारे इंटरसेप्टर मिसाईल आहे. हे इतर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना पराभूत करण्यासाठी विकसित केले गेले आहे. हवेत काही अंतर कापल्यानंतर त्याची मार्ग बदलण्याची क्षमता आहे.


दोनदा यशस्वी चाचणी


'प्रलय' हे सॉलिड प्रोपेलंट रॉकेट मोटर (Solid Propellant Rocket Motor) आणि इतर नवीन तंत्रज्ञानावर चालणारे क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र प्रणालीचा विकास 2015 च्या आसपास सुरू झाला. अशा क्षमतेच्या विकासास दिवंगत जनरल बिपिन रावत यांनी लष्करप्रमुख म्हणून प्रोत्साहन दिले होते. या क्षेपणास्त्राची गेल्या वर्षी 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.


'रॉकेट फोर्स' तयार करण्याच्या योजनेला गती 


संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, या क्षेपणास्त्रांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. या प्रकल्पामुळे सशस्त्र दलांसाठी 'रॉकेट फोर्स' तयार करण्याच्या योजनेला गती मिळेल. दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत हे देखील असे रॉकेट फोर्स तयार करण्यासाठी आग्रही होते. अलीकडेच नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी. कुमार यांनी देखील सीमेवर शत्रूंचा सामना करण्यासाठी रॉकेट फोर्स तयार करण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले होते. दरम्यान, पी-75 या पाचव्या स्कॉर्पीन पाणबुडीच्या माध्यमातून भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनले आहे.