China Covid Outbreak : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. अशात चीन पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा लपवत असल्याचं म्हटलं जात आहे. चीन सरकार आता कोरोनाची आकडेवारी जाहीर करणार नाही. द ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोग (NHC) रविवारी, 25 डिसेंबरपासून कोरोना आकडेवारी जाहीर करणे बंद करणार आहे. त्याऐवजी, चीन रोग नियंत्रण केंद्राकडून रोग प्रतिबंध, अभ्यास आणि संदर्भासाठी कोविड संबंधित माहिती जारी करण्यात येईल. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी (24 डिसेंबर) वेबसाइटवर शुक्रवार (23 डिसेंबर) पर्यंतची कोविड रुग्णांची आकडेवारी जाहीर केली.


कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये 99 जणांची वाढ


चीन सरकारने  शनिवारी माहिती दिली की, 4128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि गेल्या 24 तासांत देशात कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शुक्रवारी (23 डिसेंबर) 1760 रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेत संक्रमित रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या एकूण 28 हजार 865 लोकांचं वैद्यकीय निरीक्षण करून त्यांनाही घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये 99 जणांची वाढ झाली आहे.


कोविड आकडेवारी जारी न करण्यामागचं कारण काय?


चीन सरकारने कोरोना आकडेवारी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी बैठकीतील कोरोना आकडेवारी एका अधिकाऱ्याने जनहितासाठी लीक केली होती, यामुळे सरकारने कोरोना आकडेवारी जारी न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. एका वरिष्ठ चिनी पत्रकाराने गुरुवारी (22 डिसेंबर) रेडिओ फ्री एशियाला माहिती देत सांगितलं की, चीन सरकारची कोविड आकडेवारी संदर्भात व्हायरल होत असलेली कागदपत्रे खरी आहेत. कृती बैठकीत उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने  सार्वजनिक हितासाठी ही कागदपत्रे मुद्दाम लीक केली होती.


रेडिओ फ्री एशियाच्या अहवालानुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'झिरो-कोविड पॉलिसी' शिथिल केल्यानंतर चीनमध्ये केवळ 20 दिवसांत सुमारे 2.5 कोटी लोकांना कोविड-19 चा संसर्ग झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित सरकारी कागदपत्रांनुसार, 1 डिसेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत 2.48 कोटी लोकांना कोविड-19 ची लागण झाली. हा आकडा चीनच्या लोकसंख्येच्या 17.65 टक्के आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या


China Covid Crisis: चीनमध्ये एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 3.7  कोटी रुग्ण, 18 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण