Indian American Green Card: नवी दिल्ली : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) लवकरच मोठी घोषणा करणार आहेत. बायडन यांच्या घोषणेचा मोठा फायदा अमेरिकेत (America News) राहणाऱ्या भारतीयांना होणार आहे. पण कसा? तर, कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांच्या पार्टनर्सना याचा फायदा मिळणार आहे. ज्यांच्या पार्टनर्सकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे, त्यांनाही आता अमेरिकेचं नागरिकत्व मिळणं सोपं मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीयांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. 


न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांसाठी अमेरिकन सरकारकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे स्थलांतरित, पण ज्यांनी अमेरिकन नागरिकांशी आपली लग्नगाठ बांधली आहे, अशा नागरिकांना वर्किंग परमिट आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळवणं फारच सोपं होणार आहे. एनबीसी न्यूजनुसार, 'पॅरोल इन प्लेस' नावाच्या या कार्यक्रमाचा फायदा तब्बल पाच लाख स्थलांतरितांना होणार आहे, जे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत आहेत. यामुळे या नागरिकांचा डिपोर्टेशनपासून बचाव होणार आहे. 


अमेरिकन सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्ड आणि यूएस नागरिकत्व मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणं हाच आहे. एनबीसी न्यूजनुसार, कागदपत्रं नसलेल्या जोडीदारांना प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर वर्क परमिट मिळवण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, यासाठी काही अटी असणार आहेत. 


उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, अमेरिकन नागरिकाशी लग्न केल्यानंतर किमान 10 वर्ष अमेरिकेत राहणाऱ्या स्थलांतरितांनाच नागरिकत्व दिलं जाईल. यासह, अशा स्थलांतरित मुलांना ग्रीन कार्ड किंवा नागरिकत्व देखील मिळू शकेल, ज्यांच्या आई किंवा वडिलांनी अमेरिकन नागरिकाशी लग्न केलं आहे, त्यांना ग्रीन कार्ड दिलं जाणार आहे. 


सध्या अमेरिकन नागरिकाशी लग्न करूनही कोणी कागदपत्रांशिवाय एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ अमेरिकेत राहिल्यास त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. अशा व्यक्तीला 10 वर्षांसाठी अमेरिकेत प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हा लाभ फक्त त्या स्थलांतरितांनाच मिळेल ज्यांचा कार्यकाळ 17 जूनपर्यंत 10 वर्षांचा झाला असेल. एनबीसी न्यूजनुसार, बायडन सरकारच्या या उपक्रमाचा एक उद्देश असा आहे की, जे विद्यार्थी म्हणून अमेरिकेत येतात आणि नंतर अमेरिकन नागरिकाशी लग्न केल्यानंतर येथे स्थायिक होतात त्यांना मदत करणं.