Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील अनेक शहरे रशियन सैन्याच्या बॉम्ब हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या युद्धामुळे अनेक लोकांना इतर देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. याच दरम्यान युनायटेड नेशन्स (UN) ने म्हटले आहे की, 24 फेब्रुवारीपासून रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून सुमारे 14 लाख मुलांनी युक्रेनमधून पलायन केले असून इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. याचा अर्थ युक्रेनमधून दर मिनिटाला एक मूल निर्वासित होत आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत शेकडो मुलांसह हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


युद्धामुळे आतापर्यंत 120 अब्ज डॉलरचे नुकसान 


रशियन सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. दरम्यान, रशियन रणगाड्यांनी युक्रेनमधील वोलनोवाखा शहर उद्ध्वस्त केल्याची बातमी समोर आली आहे. मंगळवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र हल्ला केला. ज्यामध्ये एक नागरिक ठार झाला. तर अनेक लोक जखमी झाले. रशियाच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत सुमारे 120 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे युक्रेनच्या उप-अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. दुसरीकडे युक्रेनने दावा केला आहे की, युक्रेनच्या सैन्याने आतापर्यंत 13 हजारांहून अधिक रशियन सैनिक मारले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे नष्ट केली आहेत.


28 लाख युक्रेन नागरिकांनी सोडला देश 


युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या भीषण युद्धामुळे लाखो लोकांना देश सोडून जावे लागले आहे. संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी सांगितले की, 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून युक्रेनमधून इतर देशांमध्ये आलेल्या निर्वासितांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सी UNHCR ने सांगितले की, आतापर्यंत 2,808,792 निर्वासितांनी देश सोडला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील निर्वासितांची ही सर्वात मोठी संख्या आहे.


संबंधित बातम्या:


Russia Ukraine War: रशियाही आक्रमक; कॅनडाच्या पंतप्रधानांसह 300 कॅनेडियन नागरिकांवर बंदी
Russia Ukraine War : युक्रेनमधून तीन भारतीयांची सुटका; पहिल्यांदाच रशियन सैन्याने केली मदत