Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपीयन आणि इतर देशांनी रशियावर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रत्युत्तरातही रशियाने निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. रशियाने कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासह 300 जणांवर बंदी घातली आहे. कॅनडाने आणखी 15 रशियन अधिकाऱ्यांवर निर्बंध लागू केले. त्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला. 


युक्रेनमधील 'द कीव्ह इंडिपेंडेंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासह 300 कॅनेडियन नागरिकांवर रशियात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्री मेलानी जोली, संरक्षण मंत्री अनिता आनंद आणि कॅनडातील जवळपास सर्वच खासदारांचा समावेश आहे. 


युरोपीयन मानवाधिकार परिषदेतून रशिया बाहेर


रशियाने युरोपीनय मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युरोपच्या या परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या औपचारिक निर्णयाचे पत्र युरोपीयन परिषदेच्या महासचिव मारिजा पेजसिनोव्हिक बुरिक यांना देण्यात आले असल्याची माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. 


रशियाचे सदस्यत्व निलंबित करण्याच्या 25 फेब्रुवारीच्या युरोपीयन परिषदेच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. युरोपीयन परिषद रशियावर दबाव आणण्याचे साधन बनल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) आणि युरोपियन युनियन यांचा मोठा प्रभाव युरोपीयन परिषदेवर असल्याचा आरोप रशियाने केला. 


पाहा: NATO मध्ये सहभागी होणार नाही, Ukraine चे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांचं मोठं विधान



 

रशिया-युक्रेन संघर्ष रासायनिक युद्धाच्या उंबरठ्यावर, ब्रिटनचा दावा 


रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सलग 20 व्या दिवशीही सुरूच आहे. याच दरम्यान युक्रेनमध्ये रासायनिक युद्ध होऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रशिया युक्रेनवर रासायनिक अस्त्रांनी हल्ला करू शकतो, असा दावा ब्रिटनने केला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, रशिया युक्रेनवर जैविक किंवा रासायनिक शस्त्रे वापरून हल्ला करण्याचा विचार करत आहे. याआधी अमेरिकेनेही रशियावर हा आरोप केला होता. रशियन सैनिक युक्रेनच्या विविध शहरांना लक्ष्य करत आहेत. पूर्वेकडील लुहान्स्कमधील पोपस्ना शहरात व्हाईट फॉस्फरस बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे, जे मानवांसाठी अत्यंत घातक आहेत.