Russia Ukraine War : रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या खेरसन शहरातून तीन भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली. रशियन सैनिकांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. पहिल्यांदाच रशियन सैनिकांनी युद्धभूमीतून भारतीयांच्या सुटकेसाठी मदत केली आहे. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने या तीन भारतीयांची क्रीमिया आणि मॉस्कोमार्गे सुटका केली. या तीन भारतीयांमध्ये एक विद्यार्थी आणि दोन व्यावसायिकांचा समावेश आहे. 


मॉस्कोमधील भारतीय दूतावासातील राजयनिकाने 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितले की, आम्ही क्रीमियातील सिम्फेरोपोलला जाणाऱ्या बसेसच्या ताफ्यात त्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली. त्यानंतर ते रेल्वे मार्गे मॉस्कोत आणले आणि तेथून त्यांना भारतात पाठवण्यात आले. या तीन भारतीयांमधील एक विद्यार्थी चेन्नई येथील असून दोन व्यावसायिक अहमदाबाद येथील आहेत. 


युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांची सुटका करण्यास रशियन सैन्याने पहिल्यांदाच सक्रियपणे सहभाग नोंदवला. आतापर्यंत जवळपास 22 हजार भारतीय युक्रेनमधून मायदेशी आले आहेत. त्यापैकी 17000 भारतीय केंद्र सरकारच्या विशेष विमानाने भारतात दाखल झाले आहेत. युक्रेनमधून भारतीय पोलंड, हंगेरी, रोमानिया आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक या देशांत दाखल झाले आणि तेथून भारतात परतले. 


युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांसह इतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास आणि इतर मानवीय मदत पोहचवण्यासाठी रशियाने काही शहरांमध्ये काही तासांसाठी शस्त्रसंधी लागू केली होती. 


एस. जयशंकर यांचे संसदेत निवदेन
 
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत संसदेत निवदेन दिले. त्यांनी म्हटले, विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी  आम्ही सतत  आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा करत होतो. अनेक अडचणींचा यावेळी सामना करावा लागला. तरी आम्ही नागरिकांना सुरक्षित मायदेशात आणले. विद्यार्थ्यांना परत आणताना समोर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आम्ही ऑपरेशन गंगाची सुरूवात केली आहे. कठीण काठात यशस्वीरित्या राबवलेले हे मोठे ऑपरेशन होते. भारतीय दूतवासाने 15, 20 आणि 22 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी नियमावली जारी केली. सतत जाहीर होणाऱ्या नियमावलीमुळे अनेक विद्यार्थी बाहेर पडत होते. त्यांना आपले शिक्षण अर्धवट राहण्याचे भीती होती.