बीजिंग: भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष झाला आहे.  यातच युरोप दौऱ्यावर असणारे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. वांग यी म्हटले आहे की, भारत-चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या अधिकृत सीमाची आखणी झाली नसल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर यापुढेही वाद सुरूच राहतील. पण चीन भारताशी असलेल्या सर्व वादांच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढायला तयार आहे. त्यांनी हे वक्तव्य सोमवारी पॅरीसमधील ' फ्रेंच इंस्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ' या संस्थेतील एका कार्यक्रमात केले.


भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या मतभेदांचे संघर्षात रूपांतर न होण्यासाठी या दोन देशांच्या नेतृत्वामध्ये यापूर्वी एकमताने जे निर्णय झाले होते ते लागू करावेत, असेही ते म्हणाले. चीनचे भारत आणि जपानशी असलेल्या संबंधावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. परंतु पूर्व लडाखमध्ये चीनी लष्कराच्या घुसखोरीवर त्यांनी थेट उत्तर देण्याचं टाळलं.


त्यांच हे वक्तव्य चीनच्या लष्कराने लडाखमधील पेंगॉंग त्सो लेकच्या दक्षिणमध्ये हालचाली करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर काही तासातच आले. 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री भारत आणि चीनी सैन्यांमध्ये पुन्हा झटापट झाली होती.


चीनची भारतीय हद्दीतील ही घुसखोरी 15 जूनच्या गलवानमधील हिंसक संघर्षांनंतरची दुसरी मोठी घटना आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षात भारतीय सेनेचे 20 जवान शहीद झाले होते तर चीनचंही मोठं नुकसान झालंहोते.


वांग यी यांनी पुढे म्हटले आहे की, भारत-चीन संघर्षाकडे जगाचंं लक्ष आहे. या दोन देशांदरम्यान आतापर्यंत कोणत्याही अधिकृत सीमांची आखणी झालेली नाही. त्यामुळं हे अशा प्रकारचे वाद भविष्यातही होत राहतील. परंतु चीनची भारतासोबत कोणत्याही वादावर चर्चेची तयारी आहे. याआधीही चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. त्यात दोन देशांत असलेले मतभेद बाजूला ठेवून द्विपक्षीय सहकार्यावर अधिक भर देण्याचेही ठरले आहे.


वांग यांनी म्हंटले की," चीनला मोठा इतिहास आहे, तसेच  त्याच्या शेजारी देशांची संख्यादेखील अधिक आहे. या मोठ्या इतिहासामुळे एखादी दुसरी समस्या राहून गेली असेल. ती सोडवण्यासाठी आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी चर्चेद्वारे सहमती बनवण्यास तयार आहोत."


पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्यांनी घुसखोरी केली आहे. त्यावर या दोन्ही देशांदरम्यान गेली अडीच महिने सैन्य व राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. परंतु त्यात समाधानकारक प्रगती झाली नाही. नुकतंच भारताने पब्जीसह चीनशी संबंधीत 118 मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे.