मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) च्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा (India and Canada Tension) यांच्यात तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुड्रो (Justin Trudeau) यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा आरोप केला. मात्र, भारताने हे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. 18 जून रोजी हरदीप सिंह निज्जर कॅनडातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हल्लेखोरांनी हरदीप सिंह निज्जरवर अंधाधुंद गोळीबार केला. 


हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा व्हिडीओ समोर


हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसंबंधित एक व्हिडीओ समोर आल्याचं सांगितलं जात आहे. गुज्जर हत्या प्रकरणातील महत्वाचा व्हिडीओ कॅनडातील तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. वॉशिंग्टन पोस्टने यासंदर्भात माहिती दिली आहे. व्हिडीओचा आधारे वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे की, हरदीप सिंह गुज्जरची हत्या गुरुद्वारे जवळच्या पार्कींगमध्ये झाली. या हत्येमध्ये सुमारे सहा हल्लोखोर सामील होते. हे हल्लेखोर दोन गाड्यांमधील आले होते. त्यांनी गुज्जरवर सुमारे 50 वेळा गोळीबार केला. 


निज्जरची हत्या सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये चित्रित


वॉशिंग्टन पोस्टने रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, कॅनडाच्या स्थानिक शीख समुदायाच्या सदस्यांचे म्हणणं आहे की, पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचली. गुरू नानक शीख गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या तपासाबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना अधिक माहिती दिलेली नाही, असंही कॅनडाच्या स्थानिक शीख समुदायाने म्हटलं आहे. गुरुद्वारे जवळील काही व्यावसायिकांनी सांगितलं की, तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही चौकशी केली नाही आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासलं नाही. निज्जरची हत्या सिक्युरिटी कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. 


व्हिडीओच्या आधारे पुढील तपास सुरु


हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा हा व्हिडीओ तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे, त्या अनुषंगाने पुढे तपास सुरु आहे. हा व्हिडीओ 90 सेकंदांचा असल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. या व्हिडीओयामध्ये निज्जरचा राखाडी पिकअप ट्रक पार्किंगच्या जागेतून बाहेर काढताना दिसत आहे. ट्रकच्या बाजूने एक कार धावत असून त्या कारच्या पुढे एक पांढरी सेडान कार दिसत आहे.


निज्जरवर 50 वेळा गोळीबार


कॅनडाच्या स्थानिक शीख समुदायाच्या सदस्यांना तपास अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हल्लेखोरांनी निज्जरवर सुमारे 50 गोळ्या झाडल्या, त्यापैकी निज्जर यांना 34 गोळ्या लागल्या. सर्वत्र रक्त होते आणि जमिनीवर तुटलेल्या काचा होत्या. त्याच वेळी गुरमीत सिंह तूर नावाचा आणखी एक गुरुद्वाराचा नेता त्याचा पिकअप ट्रक घेऊन येतो, तो निज्जरला घेऊन बंदूकधाऱ्यांचा पाठलाग करण्यासाठी निघून जातो.


खलिस्तान चळवळ भारतात बेकायदेशीर


हरदीप सिंह निज्जर हा 45 वर्षीय खलिस्तानी चळवळीचा नेता होता. त्याची कॅनडामध्ये गोळ्या झाडून अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने जुलै 2022 मध्ये निज्जरवर पंजाबमधील एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आणि त्याला फरारी दहशतवादी म्हणून घोषित केलं. निज्जरला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. खलिस्तानी चळवळीचा उद्देश भारतातील पंजाब प्रदेशात स्वतंत्र शीख राज्य स्थापन करणे हा होता. खलिस्तान चळवळ भारतात बेकायदेशीर आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Canada Sikh : 126 वर्षांपूर्वी कॅनडात नव्हते शीख, आज तिथे भारतापेक्षाही जास्त शीख खासदार; कॅनडात स्थायिक होणारे पहिले शीख कोण?