मुंबई : खलिस्तानी (Khalistani) दहशतवादी हरदीपसिंह निज्जर हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध बिघडले आहेत. निज्जरच्या हत्येत भारतांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान टुडो यांनी केला. मात्र, भारताने ट्रुडो यांचे सर्व आरोप मोडीत काढत त्यांच्याकडे याबाबत पुरावे मागत चोथ प्रत्युत्तर दिलं आहे. या घटनेनंतर कॅनडामधील शीख स्थलांतरित चर्चेत आले आहेत. कॅनडामध्ये अनेक भारतीय वास्तव्यास आहेत. यासोबतच अनेक भारतीय विद्यार्थी कनडामध्ये शिक्षणही घेत आहेत. पण भारतीय कॅनडामध्ये पोहोचले कसे, हे सविस्तर जाणून घ्या.
कॅनडामध्ये जाणारे पहिले शीख
126 वर्षांपूर्वीपर्यंत कॅनडात एकही शीख राहत नव्हता. 1897 मध्ये पहिले शिख व्यक्ती कॅनडामध्ये गेले. 1897 मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यातील रिसालदार मेजर केसर सिंग कॅनडामध्ये स्थायिक झाले तेव्हापासून शीखांचा कॅनडात प्रवेश सुरु झाला. त्यानंतर शीखांमध्ये कॅनडाचा प्रचार झाला आणि तेथे जाणाऱ्या शीखांची संख्याही वाढत गेली. 1980 पर्यंत शीखांची संख्या 35 हजारांपर्यंत वाढली आणि त्यानंतर ही संख्या अनेक पटीने वाढून 7.70 लाखांच्या पुढे गेली.
कोण होते मेजर केसुर सिंग?
मेजर केसुर सिंग हे कॅनडाला जाणारे पहिले शीख होते. 1897 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या हिरक महोत्सव (Diamond Jubilee) पासून कॅनडामध्ये शीखांच्या आगमनाला सुरुवात झाली. मेजर केसुर सिंग हे कॅनडामध्ये स्थायिक झालेले पहिले शीख होते. 1897 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या डायमंड ज्युबिली महोत्सवाच्या परेडसाठी ते पहिल्यांदा कॅनडाला गेले. ब्रिटीश भारतीय सैन्यातील रिसालदार मेजर केसुर सिंग 25 व्या कॅव्हलरी, फ्रंटियर फोर्समध्ये होते. राणी व्हिक्टोरियाच्या हिरक महोत्सव कार्यक्रमातील परेडमध्ये हाँगकाँग रेजिमेंटचा एक भाग म्हणून ते सहभागी झाले होते.
भारतापेक्षा कॅनडात शीखांची लोकसंख्या जास्त
भारत आणि कॅनडा यांच्या लोकसंख्येच्या तुलनेनं कॅनडामध्ये भारतापेक्षा जास्त शीख लोकसंख्या आहे. भारतातील शीख लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 1.7 टक्के आहे, तर कॅनडात एकूण लोकसंख्येच्या 2.1 टक्के शीख राहतात. इंग्रजी आणि फ्रेंच नंतर पंजाबी ही कॅनडाची तिसरी प्रमुख भाषा आहे. सध्या भारतातील 13 लोकसभा खासदार शीख आहेत, तर कॅनडात शीख खासदारांची संख्या 15 आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 2016 मध्ये सांगितलं होतं की, त्यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळापेक्षा जास्त शीख मंत्री आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :