Crime News Updates: अनेकजण खोटं बोलून आपली हौस पूर्ण करत असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. कधी दुसऱ्यांबाबत खोटं सांगून, तर कधी स्वतःच्या आजारपणाचा बनाव करुन खोटं बोललं जातं. गंभीर आजाराचा बनाव करुनदेखील मदत म्हणून पैसे उकळल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. आपल्याला कॅन्सर झाला आहे, असं सांगत या तरुणानं उपचारांसाठी लोकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. एवढंच नाहीतर त्यानं आजारपणाचा बनाव रचला, उपचारासाठी पैसे उकळले आणि त्या पैशांनी हा पठ्ठ्या चक्क जुगार खेळला. दरम्यान, या तरुणानं स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. 


कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी खूप पैसे लागतात. तसेच, काही सेवाभागी संस्था, ट्रस्टही गरजू रुग्णांना मदत करतात. अनेकदा काही संस्था डोनेशन कॅम्पही चालवतात. अशा कॅम्पमधून अनेकदा रुग्णाच्या उपचारासाठी कोट्यवधींची रक्कम गोळा केली जाते.  याचाच फायदा कॅलिफोर्नियात राहणाऱ्या रॉबर्ट मर्सर (Robert Mercer) नावाच्या तरुणानं घेतला. 


"मला स्टेज 4 चा कोलन कॅन्सर आहे..."


रॉबर्ट मर्सरनं कॅन्सरचं कारण देत जुगार खेळण्यासाटी लाखोंची मदत गोळा केली. त्यासाठी त्यानं GoFundMe कॅम्पेनकडून मदत घेतली. रॉबर्टनं सांगितलं की, "मी एक पोकर प्लेयर आहे आणि लास वेगासमध्ये होणाऱ्या वर्ल्ड सीरीज पोकर मेन इव्हेंटमध्ये खेळण्याचं माझं बऱ्याच दिवसांपासूनचं स्वप्न आहे. मला याचवर्षी ऑगस्टमध्ये कळालं की, मला स्टेज 4 चा कोलन कॅन्सर आहे आणि मी फार काळ जगू शकणार नाही. त्यामुळे मला या इव्हेंटमध्ये खेळायचं आहे आणि मला माझं शेवटचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यामुळे मला मदत करा."


जुगारासाठी 10 लाख रुपये गोळा केलेत 


आपल्या पोस्टद्वारे रॉबर्टनं कॅम्पेन चालवलं आणि त्यामार्फत तब्बल 12025 डॉलर्स (सुमारे 10 लाख रुपये) गोळा केले. मात्र आता रॉबर्टनं मोठा खुलासा केला असून हे सर्व खोटं असल्याचं लास वेगास रिव्ह्यू जनरलला सांगितलं आहे. मी आजारपणाबद्दल खोटं बोललो. मला कोणताही कॅन्सर झालेला नाही. हे सर्व पैसे गोळा करण्यासाठी केलं असल्याचं त्यानं मान्य केलं. 


सत्य समोर येताच स्पर्धेतून काढून टाकलं


वृत्तपत्रानुसार, रॉबर्ट मर्सरनं जूनमध्ये GoFundMe सुरू केलं होतं. परंतु काही महिन्यांनंतर, पोकर कम्युनिटीतील लोकांना रॉबर्ट मर्सरच्या हेतूबाबत संशय येऊ लागला. यानंतर त्यानं स्वतःच आपलं खोटं उघड झालं आणि त्यानंतर लगेचंच त्याला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. 


प्रकरणाचा कायदेशीर तपास सुरू 


GoFundMe चे प्रवक्ते जेफ प्लॅट यांनी सांगितलं की, मर्सरच्या कबुलीनंतर ऑनलाईन निधी उभारणीस काढून टाकण्यात आलं आहे. "GoFundMe ला आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याबाबत झिरो टॉलरन्स आहे आणि आमच्याद्वारे लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल." प्लॅट यांनी एका निवेदनात सीएनएनला सांगितलं की, ज्यांनी रॉबर्टला मदत केली होती, त्या सर्वांना त्यांनी दिलेले सर्व पैसे परत करण्यात आले आहेत." प्लॅटच्या यांनी सांगितलं की, GoFundMe रॉबविरुद्धच्या खटल्याच्या कायदेशीर तपासातही सहकार्य करत आहे.