Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावरून देशाला (PM MODI Speech) संबोधित करणार आहेत, लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची (Opration Sindhoor) झलकही पाहायला मिळणार. नरेंद्र मोदी सलग बाराव्यांदा ध्वजारोहण करुन संबोधित करतील. पंतप्रधानांचे स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह करतील. तसेच देशभरात 79व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्साह आहे, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अनेक शासकीय कार्यालयांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलीय. मंत्र्यांच्या हस्ते ठिकठिकाणी ध्वजारोहण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारत स्वातंत्र्यदिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. या दिवशी पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतात आणि देशवासियांना संबोधित करतात. दुसरीकडे, भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्येही 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानला ब्रिटिश राजवटीपासून एकत्र स्वातंत्र्य मिळाले, परंतु दोन्ही देश वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. दरम्यान, भारतात लाल किल्ला ध्वजारोहणाचे मुख्य ठिकाण आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये पंतप्रधान कुठे ध्वजारोहण करतात?, असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
पाकिस्तानात पंतप्रधान कुठे ध्वजारोहण करतात?
भारतात लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते, त्याचप्रमाणे पाकिस्तानातही एका विशिष्ट ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. पाकिस्तानचे पंतप्रधान इस्लामाबादमधील पाकिस्तान स्मारकावर ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. पाकिस्तान स्मारक हे पाकिस्तानचे राष्ट्रीय स्मारक आहे, जे इस्लामाबादच्या शकरपरियान टेकड्यांवर बांधले गेले आहे. या स्मारकाचे बांधकाम 2006 मध्ये अभियंता सय्यद महमूद खालिद यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले आणि 23 मार्च 2007 रोजी त्याचे उद्घाटन झाले. आता ते एक संग्रहालय देखील आहे, जिथे पाकिस्तानच्या इतिहासाची आणि संस्कृतीची झलक पाहता येते.
भारतात पंतप्रधान कुठे ध्वज फडकवतात?
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. दरवर्षी या दिवशी पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात. येथूनच देशाला संबोधित केले जाते आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो. लाल किल्ला ही केवळ एक इमारत नाही, तर ती भारताच्या स्वातंत्र्याच्या भावनेचे प्रतीक आहे. हे मुघल सम्राट शाहजहान यांनी 1638 ते 1648 दरम्यान बांधले होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर भारतीय तिरंगा फडकवण्यात आला, जो देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकवला होता.