Imran Khan Corona Positive पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोना लस घेण्याच्या एका दिवसानंतर लगेचच कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. साइनोफार्म कोविड 19 या लसीची पहिली मात्रा त्यांना गुरुवारी देण्यात आली होती. पण, तरीही दुसऱ्याच दिवशी ते कोरोनाबाधित असल्याची बाब समोर आली.
आपण कोरोनाबाधित असल्याचं लक्षात येताच खान यांनी गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तेथील आरोग्यमंत्र्यांनी दिली. राजकीय पटलावर आपली कारकिर्द सुरु करण्यापूर्वी इमरान खान यांनी क्रिकेटचं मैदानही गाजवलं आहे.
गुरुवारी घेतलेली लस
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इमरान खान यांनी गुरुवारी कोरोनाची लस घेतली होती. याशिवाय त्यांनी लस घेतल्यानंतर कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता यासाठी आखून दिलेल्या नियमांचं पालन करावं असा आग्रहसुद्धा केला होता. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली होती.
पाकिस्तानमध्येही कोरोनाचं थैमान
शनिवारी पाकिस्तानमध्ये 3876 नवे कोरोनाबाधित आढळून आले. ज्यामुळं देशातील संसर्गाचा वेग वाढून 9.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 623,135 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, मागील 24 तासांमध्ये 40 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात कोरोनातून 5 लाखांहून अधिक रुग्ण बरेही झाले आहेत. ही आकडेवारी पाहता नागरिकांच्या सतर्कतेनंच कोरोना नियंत्रणात आणला जाऊ शकतो हे स्पष्ट होत आहे.