नवी दिल्ली : जपानमधील टोक्यो या भागात भूकंपाचे हादरे बसल्याचं म्हटलं जात आहे. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलनुसार 6.8 इतकी असल्याचं लक्षात येत आहे. भूकंपाचे हादरे बसल्यानंतर लगेचच स्थानिक किनारी भागात त्सुनामीच्या संकटाचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं यासंदर्भातील माहिती दिली. स्थानिक वाहिनी एनएचकेच्या वृत्तानुसार भूकंपाचा धक्का बसल्यानंतर लगेचच समुद्रात 1 मीटर म्हणजेच 3.2 फूट इतक्या उंचीच्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली. 


एएफपीच्या वृत्तानुसार स्थानिक प्रमाण वेळेनुसार हा भूकंप सायंकाळी जवळपास 6 वाजून 9 मिनिटांनी आला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात 60 किलोमीटरपर्यंतच्या खोलीवर होता. जबर तीव्रतेच्या या भूकंपानंतर अणूउर्जा प्रकल्पांचं निरीक्षण केलं जात आहे. याशिवाय स्थानिक रेल्वे सेवाही थांबवण्यात आली आहे. ज्यामध्ये शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवाही समाविष्ट आहे.


IN PICS | जागतिक आनंदी देशांच्या क्रमवारीत भारताचा 139 वा क्रमांक ; पाहा या यादीत नेमक्या कोणत्या देशांचा समावेश आहे
 
जवळपास दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 1 मार्च 2011 मध्ये जपानमध्ये अतिशय मोठा भूकंप आला होता. ज्यानंतर इथं त्सुनामीचाही तडाखा बसला होता. या आपत्तीमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, सध्या देण्यात आलेल्या त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर किनारी भागांत राहणाऱ्या सर्वांनाच सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. अद्यापही या भूकंपात नेमकी किती हानी झाली याबाबतची अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.