पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
- शांतता आणि विकासासाठी एकमेकांमध्ये सहकार्याची आवश्यकता आहे.
- ‘ब्रिक्स’ सहकार्यासाठी आधार बनली आहे. अनिश्चिततेकडे झुकणाऱ्या जगात स्थिरता आणि विकासासाठी ब्रिक्स महत्त्वाची ठरते आहे.
- कृषी, संस्कृती, पर्यावरण, ऊर्जा, क्रीडा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील आपण एकमेकांना सहकार्य करत आहोत.
- ब्रिक्समधील देश एकमेकांना भेटत आहेत, ज्यामुळे आपल्याला समजून घेणं अधिक शक्य होणार आहे.
- दारिद्र्य निर्मुलन, आरोग्य, स्वच्छता, कौशल्य, खाद्य सुरक्षा, लैंगिक समानता, ऊर्जा आणि शिक्षण यांबाबतची धोरणं ‘मिशन मोड’मध्ये आहेत.
- महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांमुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होते आहे.
- केंद्रीय बँकांच्या क्षमतेत आणखी वाढ करावी लागेल. आयएमएफसोबतच्या सहकार्यास प्रोत्साहन द्यायला हवं.
- ब्रिक्स देश इंटरनॅशन सोलर पॉवर कोएलेशनच्या माध्यमातून सौर उर्जेच्या ध्येयाला आणखी पुढे नेऊ शकतात.
- ब्रिक्सने रेटिंग एजन्सी सुरु करण्याची गरज आहे. जेणेकरुन विकसित देशांच्या स्वायत्त आणि कॉर्पोरेट संस्थांची आर्तिक गरजा पूर्ण करता येऊ शकतील.
चीनमधील शियामेन शहरात पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत झालं. काल रात्री त्यांनी तिथल्या भारतीयांशी संवादही साधला. महत्त्वाचं म्हणजे मोदी येताच चीनमध्येही ‘भारत माता की जय’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज मोदींचं शियामेन शहरात स्वागत केलं. इथेच ब्रिक्स परिषद होते आहे. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोदी चीनमध्ये असतील.
जिनपिंगसोबतच्या मुलाखतीकडे देशाचं लक्ष
डोकलाममधल्या सीमेवरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यानं दोन्ही देशांसाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. मात्र चीननं पाकिस्तानची पाठराखण करण्याचं धोरण स्वीकारलंय. दहशतवादाच्या मुद्यावरून भारतानं पाकिस्तानला लक्ष्य करू नये असा इशारा चीनच्या शी जीनपिंग यांनी भारताला ब्रिक्स परिषदेपूर्वी दिलाय. तर दहशतवाद जन्माला घालणाऱ्या पाकिस्तानला भारत खडेबोल सुनावणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजतंय.