सिंगापूर : भारतीय वंशाच्या जे. वाय. पिल्लई यांची सिंगापूरच्या हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या महिन्याच्या शेवटी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होणार आहे, पण तोपर्यंत पिल्लई यांची हंगामी राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंगापूरचे मावळते राष्ट्रपती टोनी टान केंग याम यांनी गुरुवारी आपला सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. 23 सप्टेंबर रोजी सिंगापूरच्या नव्या राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असल्याने तोपर्यंत पिल्लई हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहणार आहेत.

'द स्ट्रेट टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपतींचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर, नव्या राष्ट्रपतीच्या शपथविधीपर्यंत राष्ट्रपती पद रिक्त होण्याच्या स्थितीत असेल, तर त्याची जबाबदारी सीपीए अध्यक्ष आणि त्यानंतर संसदेच्या अध्यक्षांकडे सोपवली जाते. 1991 पासून नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा कार्यकाळ सुरु होण्यापूर्वी अशा प्रकारे राष्ट्रपती कार्यालय रिक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, सिंगापूरचे राष्ट्रपती परदेश दौऱ्यावर जातात, त्यावेळी राष्ट्रपती कार्यालयाची सर्व सूत्रे पिल्लई यांच्याकडेच असतात.  पिल्लई यांनी जवळपास 60 पेक्षा जास्त वेळा ही जबाबदारी सांभाळली असून, 2007 च्या एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक 16 दिवस राष्ट्रपती कार्यालयाचा कार्यभार सांभाळला.