न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झालेल्या बराक ओबामा यांचे भारताशी असलेले मधुर संबंध सर्वश्रुत आहेत. अमेरिकेतील वांशिक विविधता पाहून ओबामांनी आपलं स्वप्न व्यक्त केलं. भविष्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदी एखादी महिला किंवा एखादा हिंदू, ज्यू अथवा लॅटिन वंशाचा अध्यक्ष पाहण्याची इच्छा ओबामांनी बोलून दाखवली.


जर आपण सर्वांना संधीची द्वारं खुली ठेवली, तर नक्कीच भविष्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर एखादी महिला विराजमान होईल. त्याचप्रमाणे एखादा हिंदू, ज्यू आणि लॅटिन अध्यक्षही अमेरिकेला मिळेल, असा विश्वास ओबामांनी व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

'कोणास ठाऊक कोणाला हे पद मिळेल, कदाचित सर्व वंशांचा एकत्रित अध्यक्ष भविष्यात आपल्याला मिळू शकतो.' अमेरिकेतील वांशिक विविधतेवर भाष्य करत त्यांनी हे उत्तर दिलं. भविष्यात कृष्णवर्णीय अध्यक्ष अमेरिकेत यावा अशी तुमची इच्छा आहे का, हा प्रश्न ओबामांना विचारण्यात आला होता.

देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वंशाच्या व्यक्तीला समान संधी मिळायला हवी. कारण हीच अमेरिकेची खरी ताकद आहे. प्रत्येक रंगाचा, प्रत्येक वर्णाचा, प्रत्येक आकाराचा माणूस इथे संधीचं सोनं करु शकतं, अशी खात्री बराक ओबामा यांना वाटते.

2008 मध्ये बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर इतिहास घडला. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ठरले आहेत. 2012 मध्ये त्यांची पुनर्नियुक्ती झाली आणि त्यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ संपला. शुक्रवारी नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पदाची शपथ घेतील.