न्यूयॉर्क : अॅमेझॉनने हॉलिवूडमधील नावाजलेली मुव्ही कंपनी MGM (Metro-Golwyn-mayer) खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठीची करार देखील झाला आहे. 8.45 बिलियन डॉलरला (जळवपास 62,500 कोटी) हा व्यवहार झाला आहे. जळळपास शंभर वर्ष जुनी मु्व्ही कंपनी असलेल्या MGM ने हॉलिवूडला अनेक मोठ मोठे सिनेमे दिले. रॉकी, पिंक पँथर, जेम्स बाँड सारखे जगाला भुरळ पाडणारे सिनेमे MGM बॅनरखाली निर्माण झाले आहेत. यातील अनेक चित्रपटांनी ऑस्करही जिंकले आहेत.

  


मारकस लोय आणि लुईस बी मेय यांनी 17 एप्रिल 1924 रोजी MGM कंपनीची स्थापना केली होती. 97 वर्ष जुन्या MGM कंपनीकडकडे 4000 सिनेमे आणि 17000 तासांची टीव्ही लायब्ररी आहे. MGM कंपनी डिसेंबर 2020 पासून विक्रीसाठी उपलब्ध होती.


एमजीएम कंपनीकडे अनेक अ‍ॅनिमेशन चित्रपटांचे अधिकार आहेत, तसेच जेम्स बाँडच्या सर्व चित्रपटांचे प्रसारण, प्रदर्शन आणि वितरण हक्क आहेत. तसेच जेम्स बाँड सीरिजचा नवा चित्रपट 'नो टाईम टू डाय' रिलीजसाठी सज्ज आहे. या सिनेमाची रिलीज डेट आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलली गेली आहे.  या डीलमुळे अॅमेझॉनला आपल्या व्हिडीओ स्ट्रीमिंगचा कंटेन्ट वाढवण्यास मदत होणार आहे. व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्विसमध्ये अॅमेझॉन प्राईमची थेट स्पर्धा नेटफ्लिक्स आणि डिज्नी+ या सारख्या कंपन्यांशी आहे. अॅमेझॉनचं हे दुसरं मोठं अधिग्रहन आहे.  याआधी अॅमेझॉनने 2017 मध्ये होल फूड्स कंपनी 14 बिलियन डॉलरला खरेदी केली होती. 


अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि अॅमेझॉन स्टुडिओचे सिनियर व्हाईस प्रेसिडंट माईक हॉपकिन्स म्हणाले की, MGM कडे 4000 हून अधिक चित्रपटांचा विस्तृत कॅटलॉग आहे. 12 अँग्री मॅन, बेसिक इन्स्टिंट, क्रीड, जेम्स बाँड,  लिगली ब्लॉन्ड, मूनस्ट्रक, पॉल्टर्जिस्ट, रॅगिंग बूल, रोबोकॉप, रॉकी, सायलेन्स ऑफ लॅम्ब्ज, स्टारगेट, थेलमा अँड लुईस असे अनेक सुपरहिट चित्रपट आणि 17,000 टीव्ही कार्यक्रम यांचा संग्रह आहे. MGM कडे 180 हून अधिक अॅकॅडमी अॅवॉर्ड्स आणि 100 एमी अॅवॉर्ड्स आहेत.