वॉशिग्टन :   अमेरिकेकडून भरमसाठ निधी घ्यायचा आणि तो भारताविरोधातील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरायचा या पाकिस्तानच्या कृतीला यापुढेही चाप बसणार आहे. या आधीच्या ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहाय्यता निधी बंद केला होता. ट्रम्प प्रशासनाने घेतलेला निर्णय आता नवीन बायडन प्रशासनानेही कायम ठेवला असल्याची माहिती पेन्टॅगनने दिली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 


नुकतंच अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केलीआहे. त्यामध्ये पाकिस्तानशी अमेरिका चांगले संबंध ठेवण्यावर भर देत आहे असं सांगितलं. त्याचबरोबर अफगानिस्तानच्या प्रश्नामध्ये पाकिस्तानने अमेरिकेला मदत करावी अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी जिनेव्हा येथे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली होती. त्यामुळे अमेरिकेने आपली बंद केलेली आर्थिक रसद पुन्हा सुरु होईल अशी आशा पाकिस्तानला होती. एवढं होऊनही अमेरिकेने पाकिस्तानला निधी न देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. 


पाकिस्तानला देण्यात येणारा सुरक्षा सहाय्यता निधी अद्यापही बंद आहे. आपल्या या आधीच्या निर्णयामध्ये अमेरिेकेने कोणताही बदल केला नाही. या पुढे या निर्णयात बदल होईल की नाही यावर आताच भाष्य करणे उचित नाही असं पेन्टॅगनचे माध्यम सचिव जीन किर्बी यांनी सांगितलं. 


या आधी 2018 साली तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देण्यात येणारा आर्थिक सुरक्षा सहाय्यता निधी बंद केला होता. पाकिस्तानची दहशतवादासंबंधीची भूमिका ही दुटप्पीपणाची असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 


अमेरिकेकडून मिळणारा भरमसाठ निधी पाकिस्तान हा भारताविरोधात वापरत असल्याची तक्रार या आधी अनेकवेळा भारताने केली होती. काश्मिरमध्ये ज्या काही दहशतवादी कारवाया होतात त्यामध्ये अमेरिकेकडून देण्यात आलेल्या या निधीचा वापर केला जात होता. आता पाकिस्तानला हा निधी मिळणार नसल्याने दहशतवादाला काही प्रमाणात चाप बसण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या :