Al-Zawahiri Killed: अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा (Al Zawahiri) खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ठार मारले आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, अल-जवाहिरीला मारण्यात पाकिस्तानचा हात असून पाकिस्तानने पैसे घेऊन अल-जवाहिरीला मारले असल्याची बातमी आहे. अल जवाहिरी महिनाभरापूर्वी पाकिस्तानातून अफगाणिस्तानला गेला होता.


जवाहिरीच्या प्रत्येक हालचालीची माहिती पाकिस्तानी लष्कराला?


पाकिस्तानातील वास्तव्यादरम्यान अल-जवाहिरीच्या प्रत्येक हालचालीची माहिती पाकिस्तानी लष्कराला देण्यात आली होती. तालिबानच्या संपर्कात असल्यामुळे अल-जवाहिरी कुठे राहतो याची माहिती होती. अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. 


अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा खात्मा 


अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा (Al Zawahiri)  खात्मा केल्याची घोषणा अमेरिकेने केली. अफगाणिस्तानची राजधानी काबूलजवळ (Kabul) असलेल्या एका सुरक्षित ठिकाणी अमेरिकेने ड्रोन हल्ला (US Drone Attack) करत जवाहिरीचा खात्मा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याची अधिकृत घोषणा केली. जवाहिरीने केलेली एक चूक त्याला महागात पडली आणि अमेरिकेने संधी साधली असल्याची माहिती समोर आली आहे. 


तालिबानचे सरकार आल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये परतला


अल जवाहिरी हा याआधी पाकिस्तानमध्ये लपला होता. मात्र, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये परतला. तालिबानचा गृहमंत्री आणि कुख्यात दहशतवादी सिरादुद्दीन हक्कानीने जवाहिरीला सर्वात सुरक्षित स्थळी लपवले होते.  जवाहिरीच्या मागावर असलेल्या अमेरिकेला त्याचा ठावठिकाणा त्याच्या एका सवयीमुळे लागली असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. 


अमेरिकेनं काबूलमध्ये हेलफायर मिसाईल वापरून धोकादायक दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ठार मारले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याबाबत ट्वीट करून सांगितलं की, रविवारी माझ्या आदेशानुसार, काबुलमधील हवाई हल्ल्यात अल-जवाहिरी मारला गेला. आता न्याय मिळाला आहे. अमेरिकेनं रविवारी सकाळी 6.18 वाजता एका गुप्त कारवाईत अल-कायदा जवाहिरीला ठार केलं. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा प्रमुख मारला गेला. मात्र, यानंतर तालिबानचा भडका उडाला आणि त्यांनी हे दोहा कराराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: