Ukraine Helicopter Crash : जवळपास एक वर्षभरापेक्षा जास्त काळापासून रशिया आणि युक्रेनमध्ये (russia ukraine war news) युद्ध सुरू आहेत. या युद्धादरम्यानच युक्रेनची राजधानी कीव येथे मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी कीवमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून यात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचा देखील मृत्यू झालाय. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री आणि अन्य एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचा अपघात कीवमधील छोट्या मुलांची देखभाल करणाऱ्या एका केंद्राजवळ झालाय.


राष्ट्रीय पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी दिलेल्या माहितीनुसार, " हेलिकॉप्टर अघातात आतापर्यंत दोन मुलांसह एकूण 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांच्यासह गृहमंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या डेनिस मोनास्टिरस्की यांची 2021 मध्ये युक्रेनचे गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.






मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनची राजधानी कीवपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रोव्हरी भागात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. या आगीत होरपळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.  


पोलिसांनी सांगितले की, मृतांपैकी नऊ जण कीवच्या ब्रोव्हरी येथे कोसळलेल्या आपत्कालीन सेवा देणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये होते. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे. ब्रोव्हरी शहर कीवच्या उत्तर-पूर्वेस आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये घटनेनंतर सुरू असलेले बचावकार्य दिसत आहे.   


दरम्यान, हे हेलिकॉप्टर रशियाच्या हल्ल्यात क्रॅश झाले आहे की इतर कोणत्या कारणाने याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिवाय राजधानी कीवमध्ये कोणत्याही हल्ल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. 


महत्वाच्या बातम्या


Nashik Bus Fire : नाशिकमध्ये थरार! चालत्या बसने घेतला पेट, चालकाचं प्रसंगावधान, 35 प्रवाशांचे वाचले प्राण!