Underworld Terror Funding Case: मुंबईतल्या व्यापाऱ्यांकडून वसूल केलेली खंडणी हवालामार्गे पाकिस्तानात (Pakistan) जात असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने केलेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएच्या (NIA) ताब्यात असलेल्या आरिफ भाईजान नावाच्या एका आरोपीच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.
2017-18 या वर्षात त्याने मुंबईत एका व्यापाऱ्याला धमकावत 17 कोटींची खंडणी वसूल केली होती. ही खंडणी हवालामार्गे छोटा शकीलपर्यंत पोहोचवल्याची कबुली या आरोपीने दिलेली आहे. या रकमेचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये होत असल्याची माहिती समोर आली आहे. छोटा शकील हा कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील वॉन्टेड अतिरेकी दाऊदचा राईट हँड आहे.
पैसे मिळवण्यासाठी टोकन म्हणून 10 रुपयांची भारतीय नोट
तपासादरम्यान महिती समोर आली की, आरोपी आरिफ शेखच्या सांगण्यावरुन शब्बीर शेखने 29 एप्रिल 2022 मालाडमधील हवाला ऑपरेटरकडून 25 लाख रुपये घेतले होते. आरोपी शब्बीर शेख याने ओळख लपवण्यासाठी 'शाहिद' नावाचा वापर केला मात्र त्याने चुकून आपला खरा मोबाईल नंबर दिला. सीरिअल क्रमांक 14L615464 असलेली 10 रुपयांची भारतीय नोट पैसे मिळवण्यासाठी टोकन म्हणून वापरली आणि 25 लाख रुपयांसाठी '25 किलो' कोड शब्द वापरण्यात आला.
एबीपी न्यूजच्या हाती हवालाचा मेसेज लागला आहे. या मेसेजमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, पैसे कोणाला द्यायचे आहेत? आणि नोटेचा टोकन नंबर काय आहे?. एनआयएच्या तपासात हेही समोर आले आहे की, सूरतमधील रसीद भाई मारफानी नावाच्या हवाला ऑपरेटरने मुंबईला 25 लाख रुपये पाठवण्यास सांगितले होते. रसीद भाई पाकिस्तानी नागरिक असून तो दुबईत राहतो. रसीदने सूरतच्या हवाला ऑपरेटरला हे पैसे लवकरात लवकर मुंबईला पाठवा, हे पैसे छोटा शकीलचे असल्याचे सांगितले होते.
पाकिस्तानच्या विमानतळावर अंडरवर्ल्डचा कब्जा
पाकिस्तानच्या (Pakistan) विमानतळावर अंडरवर्ल्डने कब्जा केला आहे. स्वतःच्या माणसांवर इमिग्रेशनचा स्टॅम्प लागू देत नाहीत. NIA च्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. NIA ने अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणात सलीम फ्रूटच्या पत्नीची चौकशी केली. त्या चौकशीत सलीम फ्रूटच्या (Saleem Fruit) पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. सलीम फ्रूट याच्या पत्नीच्या वक्तव्यानुसार पाकिस्तान विमानतळ आणि तेथे काम करणाऱ्या व्यक्ती अंडरवर्ल्डच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. अंडरवर्ल्डने जर ठरवले तर कोण पाकिस्तानात येतंय आणि कोण पाकिस्तान सोडून जातंय याची नोंद जगात कुणाला मिळणार नाही.