बीजिंग : चीनमधून उदयास आलेल्या कोरोना व्हायरसचा जग अद्यापही सामना करत आहे. त्याच आता चीनमधून चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनमुळे मानवी संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. नॅशलन हेल्थ कमिशनने याची पुष्टी केली. संक्रमित 41 वर्षीय व्यक्ती झेनजियांग शहरातील रहिवासी आहे. 28 मे रोजी एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा H10N3 स्ट्रेन या रूग्णात आढळला आहे. मात्र रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे आणि लवकरच या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.


चीनमध्ये बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनच्या संसर्गाची पहिलीच घटना


पोल्ट्रीमधून मानवामध्ये विषाणूचे संक्रमण होण्याची ही तुरळक घटना आहे आणि यातून साथीचा रोग होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने, मात्र या व्यक्तीला H10N3 या स्ट्रेनची लागण कशी याची माहिती दिली नाही.  बर्ड फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यास एव्हियन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात आणि बर्‍याच प्रकारचे स्ट्रेन यामध्ये असतात. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले की, H10N3 स्ट्रेनमधून मानवी संसर्गाची कोणतीही घटना यापूर्वी जगभरात नोंदली गेली नव्हती.


साथीचा रोग होण्याची शक्यता कामी


H10N3 कमी संसर्गजन्य आहे किंवा पोल्ट्रीमध्ये आढळणारा स्ट्रेन तुलनेने कमी गंभीर आहे. त्यामुळेचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झाचे अनेक प्रकार आहेत आणि अधूनमधून लोकांना याची लागण होते. विशेषत: पोल्ट्री फार्म चालवणार्‍या लोकांना याची लागण होते. 2016-17 दरम्यान जवळजवळ 300 लोकांचा मृत्यू H7N9 स्ट्रेनमुळे झाला होता. त्यानंतर बर्ड फ्लूमुळे मानवी संक्रमणाची कोणतीही लक्षणीय संख्या आढळली नाही.


बर्ड फ्लू हा इन्फ्लूएन्झा टाईप ए विषाणूमुळे पसरणारा एक आजार आहे. सामान्यत: हा विषाणू चिकन, कबूतर आणि इतर पक्ष्यांमध्ये आढळतो. H5N1, H7N3, H7N7, H7N9 आणि H9N2 सारख्या इन्फ्लूएंझा विषाणूचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही सौम्य आहेत तर काही अधिक भयंकर आहेत.