बिजिंग : चीन सरकारकडून आता जोडप्यांना तिसऱ्या मुलाच्या जन्मासाठीही परवागनी देण्यात येणार आहे. चीनमधील लोकसंख्येचं वाढतं वयोमान आणि देशातील दीर्घकालीन आर्थिक परिस्थितीबाबत धोका निर्माण करणारा घटणारा जन्मदर पाहता हा निर्णय घेतला जात असल्याचं कळत आहे. 


xinhua या वृत्तसंस्थेकडून यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं. शिवाय इथं सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यासंबंधीच्या नियमांनाही योग्य पद्धतीने लागू करण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. 






चीनमधील सरकारकडून हळूहळू त्यांच्या काही कठोर धोरणांमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. याचंच एक उदाहरण म्हणजेच हा निर्णय, ज्यामुळं कैक कुटुंबामध्ये कित्येक वर्षांपासून एकाच बाळाचा जन्म होत होता. 2016 मध्ये चीनमध्ये जोडप्यांना दुसऱ्या बाळास जन्म देण्याची परवानगी दिली. पण, यानंही घटणाऱ्या जन्मदरात कोणताही फरक पडला नाही. ज्यामुळं अखेर आता चीन तिसऱ्या बाळाच्या जन्मासंबंधीच्या निर्णय़ावर पोहोचलं आहे.


2025 च्या आधीच लोकसंख्येत होणार वाढ 


चीनमध्ये 1961 नंतर जन्मदरात कमालीची घट झाली. ज्याचाच अर्थ येथील लोकसंख्येतही घट होण्याची चिन्हं दिसू लागली. परंतु आता मात्र या निर्णयानंतर लोसकंख्यावाढीत घट झालेल्या या देशात 2025 च्या आधी सर्वाधिक लोकसंख्या असेल. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार मागील दशकात 0.53 टक्के वार्षिक सरासरीच्या वेगानं या प्रमाणात वाढ झाली होती. 


मागील वर्षी 1961 नंतर सर्वाधिक कमी बालकांचा जन्म


पूर्व आशिया आणि युरोपात लहान कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत आहे. चीनमध्ये मात्र अधिकाधीक कुटुंबांना दोन मुलांच्या जन्मासाठीची परवानगी देऊनही जन्मदरातील वाढ अल्प प्रमाणातच झाली. अनेक पालकांनी जीवनशैली आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळं लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं. मागील वर्षी चीनमध्ये केवळ 1.2 कोटी बालकांचा जन्म झाला होता. 1961 नंतरची ही सर्वात कमी नोंद ठरली होती.