गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ग्रेटाने स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरुवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. संपूर्ण जगभरातून ग्रेटाच्या या कृतीचं कौतुक करण्यात येत होतं. मग ते रस्त्यावर उतरून करण्यात आलेली आंदोलनं असो किंवा संयुक्त राष्ट्राची बैठकीत काही देशांविरोधात करण्यात आलेलं तिचं भाषण, ग्रेटाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी आवाज उठवला आहे.
जेव्हा व्हायरल झालं होतं ग्रेटाचं भाषण
सप्टेंबरमध्ये ग्रेटा थनबर्गने UN मध्ये केलेल्या भाषणाची संपूर्ण जगभरात चर्चा होती. या भाषणात तिने जगभरातील नेत्यांना थेट प्रश्न विचारला होता, 'How Dare You?'. ग्रेटा म्हणाली होती की, जगभरातील अनेक मोठे देश कार्बन उत्सर्जनाकडे दुर्लक्ष करत असून ते रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाहीत, त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्येचा संपूर्ण जगाला सामना करावा लागत आहे.
ग्रेटा थनबर्ग 2015 मध्ये चर्चेत आली होती. ऑगस्ट 2018 मध्ये अवघ्या 15 वर्षांच्या ग्रेटाने स्वीडिश संसदेबाहेर आंदोलन करण्यासाठी शाळेला सुट्टी घेतली होती. तिच्या हातात एक बोर्ड होता, त्यावर लिहिलं होतं की, 'stronger climate action'. जसं इतर मुलांना याबाबत माहिती मिळाली त्यानंतर तेदेखील ग्रेटाच्या चळवळीत सहभागी झाले.
कोण आहे ग्रेटा थनबर्ग?
अवघ्या 16 वर्षांच्या ग्रेटाला नोबेल पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं होतं. तसेच अवघ्या काही महिन्यांत जगातील पर्यावरण चळवळीची आंतराष्ट्रीय राजदूतही झाली. डिसेंबर 2018मध्ये पोलंडमधील कॅटोविस शहरात जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मानही या शाळकरी मुलीला मिळाला होता. एवढचं नाहीतर 200 राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांना ग्रेटाने जाहिरपणे फैलावर घेतले होते.