मुंबई/हेलिंस्की : वयाच्या अवघ्या 34 वर्षात पंतप्रधान! होय, सना मरिन फिनलॅण्डच्या नव्या पंतप्रधान बनल्या असून त्यांचं वय केवळ 34 वर्ष आहे. फिनलॅण्डच्या राजकीय इतिहासात सना मरिन या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. साऊली नितीस्तो यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर सना मरिन पंतप्रधान बनतील अशी अटकळ बांधली जात होती. सना मारिन थेट पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नाहीत. याआधी त्या परिवहन आणि दूरसंचारमंत्रीही होत्या.


राजकीय अस्थिरतेमधून वाटचाल करणाऱ्या फिनलॅण्डची जबाबदारी आता सना मरिन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सना मरिन यांच्या मंत्रीमंडळात महिलांचा भरणा आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या देशाच्या सत्ताधारी पक्षाने अँटी रिनी यांच्या राजीनाम्यानंतर सना मरिन यांची निवड केली आहे. "नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी पूर्णत: तयार आहे," असं सना मरिन म्हणाल्या.

सना मारिन यांच्या नावावर सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम
34 वर्षीय मरिन या केवळ फिनलॅण्डच नाही तर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या आहेत. यापूर्वी हा मान यूक्रेनचे पंतप्रधान ओलिंस्की होन्चारुक यांच्या नावावर होता. आतापर्यंत ते जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होते. परंतु आता सना मरिन यांनी वयाच्या 34 वर्षी पतंप्रधानपदी विराजमान होऊन हा मान आपल्या नावावर केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न 39 वर्षांच्या आहेत, तर यूक्रेनचे पंतप्रधान ओलिंस्की होन्चारुक 35 वर्षांचे आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनबाबत असं म्हटलं जातं की तो 35 वर्षांचा आहे. सना मरिन या फिनलॅण्डच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.

कोण आहेत सना मारिन?
- सना मरिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 मध्ये फिनलॅण्डमध्ये झाला होता.
- 2012 मध्ये टॅम्पियर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली. यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.
- 2015 मध्ये सना पहिल्यांदा संसदेच्या सदस्य झाल्या.
- 2017 मध्ये त्यांची सिटी काऊन्सिलमध्ये निवड झाली.
- 2019 मध्ये त्या पहिल्यांदा सरकारमध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी परिवहन आणि दूरसंचार मंत्रालय सांभाळलं.

समलैंगिक पालकांनी संगोपन केलं, मारिन यांना एक मुलगी
सना मरिन याच आठवड्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. सेंटर-लेफ्ट आघाडीचं नेतृत्त्व मारिन यांच्या हाती असेल आणि त्यांना इतर पाच पक्षांसोबत एकत्र काम करुन सरकार चालवायचं आहे. विशेष बाब म्हणजे या पाच पक्षांच्या प्रमुख या महिला आहेत. सना विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे. रंजक गोष्ट म्हणजे त्यांचं पालनपोषण, संगोपन समलैंगिक पालकांनी केलं आहे. त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचं श्रेय आपल्या पालकांनाच देतात.

'वय, स्त्री-पुरुषाने मला फरक पडत नाही'
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या सना मरिन म्हणाल्या की, "माझ्यासाठी कमी वय किंवा महिला असणं ही बाब महत्त्वाची नाही. मी कधीही माझं वय आणि स्त्री-पुरुष असा विचार केला नाही. मी फक्त अशा गोष्टींचा विचार करते, ज्यातून मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. राजकारणात माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवणाऱ्या लोकांबाबत मी विचार करते."


फिनलॅण्डची राजकीय अस्थिरतेमधून वाटचाल
फिनलॅण्ज सध्या राजकीय अस्थिरतेमधून वाटचाल करत आहे. याची सुरुवात पोस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाने झाली. संपूर्ण देशभरातील पोस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनामधील कपातीविरोधात आंदोलन केलं. मात्र नोव्हेंबरच्या अखरेच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला, परंतु पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.