मुंबई : अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासा (NASA) ची आणखी एक मानवी अंतराळ मोहिम (Human Space Mission) यशस्वी झाली आहे. नासाचे चार अंतराळवीर (Astronaut) सहा महिन्यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर सोमवारी पृथ्वीवर (Earth) उतरले आहे. या अंतराळवीरांनी सहा महिने अंतराळात घालवले. नासाचं स्पेसएक्स क्रू-6 (NASA SpaceX Crew-6 ) चार अंतराळवीरांना घेऊन सहा महिन्यांनंतर पृथ्वीवर उतरलं आहे. स्पेसएक्स क्रू-6 सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच स्पेस स्टेशनवर राहिलं. सहा महिने स्पेस स्टेशनवर राहिल्यानंतर स्पेसएक्स कॅप्सूल (SpaceX Capsule) फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर अटलांटिक समुद्रामध्ये पॅराशूटच्या साहाय्यान उतरवण्यात आलं आणि चारही अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले.


सहा महिन्यानंतर चार अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले


सीएनएनच्या रिपोर्टनुसार, फ्लोरिडाच्या स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री उशिरा 12.05 वाजेच्या सुमारास हे कॅप्सूल पृथ्वीवर उतरलं आणि त्यातून चारही अंतराळवीर सुखरुप उतरले. हे अमेरिकन अंतराळ संस्थाम म्हणजेच नासा आणि एलॉन मस्क यांची खाजगी अंतराळ संस्था स्पेसएक्स यांची संयुक्त मोहिम होती. स्पेसएक्स क्रू-6 रविवारी सकाळी 7.05 वाजता (युरोपीय स्थानिक वेळ) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरुन पृथ्वीवर परतण्यासाठी रवाना झाले होते. रिपोर्टनुसार, स्पेसएक्स क्रू-3 ची कॅप्सूल पृथ्वीवर परतताना मोठा गडगडाट झाला. यामुळे मोठा आवाज झाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरणही पसरलं होतं.






नासा आणि स्पेसएक्सची संयुक्त मोहिम


दरम्यान, काही लोकांनी अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर उतरतानाचं दृष्य पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव प्रत्यक्षात पाहिला. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट करत व्हिडीओही पोस्ट केला. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''वेलकम बॅक क्रू6... स्पेसएक्स ड्रॅगन एनडेव्हर अंतराळयानातील चार अंतराळवीर सोमवारी, 4 सप्टेंबर रोजी 12.17 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. त्यांची 186 दिवस स्पेस स्टेशनवर राहण्याची मोहिम यशस्वी झाली.''


'हे' चार अंतराळवीर सुखरुप परतले


रिपोर्टनुसार, नासाचे अंतराळवीर स्टीफन बोवेन आणि वॉरेन ‘वुडी' होबर्ग, रशियाचे आंद्रेई फेदयेव आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) चे सुल्तान अल-नेयादी हे चार अंतराळवीर यशस्वी अंतराळ मोहिमेनंतर सुखरुप जमिनीवर उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनने याचा व्हिडीओही ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. सुल्तान अल-नेयादी संयुक्त अरब अमिरात (UAE) चे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर वास्तव्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (International Space Station) अंतराळातील एक अनोखी विज्ञान प्रयोगशाळा (Laboratory) आहे. येथे अंतराळासंदर्भात संशोधन करुन अनेक रहस्यांवरील पडदा उलगडण्याचा प्रयत्न सुरु आहे.