World News: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या समोरील अडचणी कमी व्हायचं काही नाव घेत नाही. पंतप्रधानपदानंतर आता बोरिस जॉन्सन यांनी खासदारकीचा देखील राजीनामा (Resigns as MP) दिला आहे. ‘पार्टीगेट’ प्रकरणामुळे जॉन्सन यांना राजीनामा देण्याची वेळ आली, बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता त्या जागेवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. पार्टीगेट घोटाळ्याच्या चौकशीत बोरिस जॉन्सन यांनी संसदेची दिशाभूल केल्याचे आढळून आले आणि हाऊस ऑफ कॉमन्समधून त्यांच्या दीर्घकाळ निलंबनाची शिफारस झाली, यानंतर बोरिस जॉन्सन यांनी ताबडतोब खासदारकीचा राजीनामा दिला.


नेमकं प्रकरण काय?


कोरोना काळात ब्रिटनमध्ये देखील लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरु होती. कोरोनाच्या साथीमुळे ब्रिटनमध्ये देखील निर्बंध लादण्यात आले होते, त्यावेळी नियमांचं उल्लंघन करुन पंतप्रधान पदावर असलेल्या बोरिस जॉन्सन यांनी डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी पार्टी आयोजित केली होती. यावेळी, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप बोरिस जॉन्सन यांच्यावर करण्यात आला. ‘पार्टीगेट’ या नावाने हे प्रकरण गाजलं. या प्रकरणी जॉन्सन यांना दीर्घकाळासाठी निलंबित करण्यात यावं, अशी शिफारस करण्यात आली होती, परंतु, त्याआधीच बोरिस जॉन्सन यांनी स्वत:च आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.


राजीनामा दिल्यानंतर काय म्हणाले बोरिस जॉन्सन?


विशेषाधिकार समितीचं निलंबनासंबंधित पत्र मिळालं असल्याचं बोरिस जॉन्सन म्हणाले. तर, आपली संसदेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सध्याच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हॅरिएट हरमन यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्यवस्थापित केलेल्या समितीद्वारे लोकशाहीविरोधी मला बाहेर काढलं जाऊ शकतं, यावर विश्वास बसत नसल्याचं जॉन्सन म्हणाले. तर सभागृह सोडून जाताना वाईव वाटत असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.


संसद समितीने आतापर्यंत मी मुद्दाम किंवा जाणूनबुजून संसदेची दिशाभूल केल्याचा एकही पुरावा सादर केला नसल्याचं बोरिस जॉन्सन म्हणाले. लॉकडाऊन काळात डाऊनिंग स्ट्रीटमध्ये आयोजित केलेल्या पार्टीमध्ये लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप योग्य नाही, असंही जॉन्सन पुढे म्हणाले. संसद समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनी पुरावे सादर होण्याआधीच माझ्यावर आरोप केले आणि प्रतिक्रिया दिल्याचंही बोरिस जॉन्सन म्हणाले.


स्नेहभोजन हा अत्यावश्यक कार्यक्रम होता आणि त्यामुळे त्याला परवानगी देण्यात आली असल्याचं बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केलं. स्नेहभोजनावेळी आवश्यक त्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्यात आलं होतं, असं देखील ते म्हणाले. या वर्षी मार्चमध्ये विशेषाधिकार समितीला दिलेल्या जबाबामध्ये बोरिस जॉन्सन यांनी संसदेची दिशाभूल केल्याचं मान्य केलं होतं. मात्र, मी जाणूनबुजून केलं नाही, या मतावर ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन ठाम होते.


हेही वाचा:


Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प गुन्हेगारी खटला दाखल होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष, व्हाईट हाऊसमधीस संवेदनशील कागदपत्रांच्या चोरीचा आरोप