Britain Political Crisis : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांचा ब्रिटनचे पंतप्रधान होण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Borris Johnson) यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढता पाय घेतला आहे. ब्रिटनमध्ये सध्या राजकीय संकट वाढताना दिसत आहे. या परिस्थितीत बोरिस जॉन्सन यांनी काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता ऋषी सुनक यांचा भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. बोरिस जॉन्सन यांच्या निर्णयामुळे आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक विजयाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.


पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन बाहेर


ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बोरिस जॉन्सन मागे हटले आहेत. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस (Liz Truss) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या दुसऱ्या नेत्याची निवड करण्यात येणार आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षामध्ये सध्या मतभेट पाहायला मिळत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढलं आहे. जॉन्सन यांनी आपल्या निर्णयाबद्दल सांगितले की, जोपर्यंत संसदेत तुमचा पक्ष एकसंघ नाही तोपर्यंत तुम्ही प्रभावीपणे शासन करू शकत नाही. त्यामुळे या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडणं योग्या राहील.


पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर


लिझ ट्रस यांनी 20 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा राजकीय पेच वाढला आहे. देशाला आपला पंतप्रधान पुन्हा निवडायचा आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक नावे आहेत, मात्र दोन नावे आघाडीवर होती. यामध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव होतं. आता बोरिस जॉन्सन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे.


ऋषी सुनक यांनी उमेदवारी जाहीर केली


भारतीय वंशाचे ब्रिटिश खासदार ऋषी सुनक हे पुन्हा एकदा ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक यांनी रविवारी 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, यावेळी कंझर्वेटिव्ह पक्षाचे 128 खासदार सुनक यांना पाठिंबा देत आहेत. पंतप्रधान होण्यासाठी किमान 100 खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. ऋषी सुनक यांच्याकडे त्याहूनही अधिक खासदारांचा पाठिंबा आहे.